नेमबाजीतील सुवर्णपदकाने स्वप्निलच्या पदांची हॅटट्रिक पूर्ण; कुटुंबियांवर शुभेच्छांचा वर्षाव | पुढारी

नेमबाजीतील सुवर्णपदकाने स्वप्निलच्या पदांची हॅटट्रिक पूर्ण; कुटुंबियांवर शुभेच्छांचा वर्षाव

गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : स्वप्नील सुरेश कुसाळे या युवकाने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सलग तीन दिवस पदांची हॅटट्रिक करत सुवर्णपदक जिंकले. अझरबैजान देशातील बाकु शहरात ही स्पर्धा सुरू आहे. या आनंदाने राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी ग्रामस्थांनी शनिवारी पुन्हा आतषबाजी करुन एकच जल्लोष केला.

स्वप्नीलने गुरुवारी वैयक्तिक गटात आणि शुक्रवारी सांघिक गटात रौप्यपदक जिंकले होते. शनिवारी पुन्हा त्याने मिश्र गटात सुवर्णपदक पटकावत पदांची हॅटट्रिक केली आहे. राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी हे त्याचे मूळ गाव आहे.

कुसाळे कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव

स्वप्निलच्या या कामगिरीमुळे त्याच्या कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरी कांबळवाडी परिसराबरोबरच राधानगरी तालुक्यातून लोकप्रतिनिधी आणि क्रीडाप्रेमींची रीघ लागली आहे. प्राथमिक शिक्षक असलेले स्वप्निलचे वडील सुरेश कुसाळे यांचे सर्वांनी अभिनंदन केले. अझरबैजान मधून मायदेशी परतल्यानंतर स्वप्निलचे जल्लोषी स्वागत करून त्याची भव्य मिरवणूक काढण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे . 2024 च्या फ्रान्स ऑलिंपिक स्पर्धेसाठी स्वप्निल जोरदार तयारी करत आहे. तो ऑलम्पिकमध्ये निश्चित सुवर्णपदक मिळवेल असा ठाम विश्वास स्वप्निलचे वडील सुरेश कुसाळे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

Back to top button