औरंगाबाद : अखेर अंबाडी प्रकल्पात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला | पुढारी

औरंगाबाद : अखेर अंबाडी प्रकल्पात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

कन्नड ; पुढारी वृत्तसेवा : शहरानजीक असलेल्या कै. आप्पासाहेब नागदकर (अंबाडी) प्रकल्पात शनिवारी (दि.०४) पोहण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या तरूण बुडल्याची घटना उघडकीस आली होती. अखेर आज बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाच्या पथकाला यश आले .

इम्रान शेख (वय २८, रा. सांताक्रूझ, वाकोला मुंबई) हा कन्नड शहरातील सायद कुरेशी आणि खालिद कुरेशी या मित्रासोबत सुट्टीला आला होता. तो शनिवारी (दि.०४) सायंकाळी शहराजवळ असलेल्या अंबाडी प्रकल्पवर पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.  ही माहिती प्रथमदर्शनी असलेल्या इतर लोकांनी शहर पोलीस ठाण्यात कळविली. घटनेची माहिती मिळताच कुरेशी यांच्या नातेवाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली.रात्री उशिरा पर्यंत शोध घेतला, मात्र इम्रानचा शोध लागला नाही. रात्री अंधार आसल्याने शोध कार्यास अडथळा आल्याने शोधकार्य थांबविले होते.

आज (दि.५) सकाळी शोध पुन्हा सुरू करण्यात आला. यासाठी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान इम्रानचा मृतदेह सापडला.  शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इम्रान विवाहित असून, त्यास दोन मुले आहेत.

अंबाडी प्रकल्पाची सुरक्षा रामभरोसे

शहराला पाणीपुरवठा करणारा व शहरानजीक आसलेल्या अंबाडी प्रकल्पाची सुरक्षा रामभरोसे असून, येथे कोणताही धोका असलेला आवश्यक सूचना फलक नाही.  या ठिकाणी पाटबंधारे विभागाचे संबधित कर्मचारी फिरकत नाहीत. त्यामुळे अनेकदा या प्रकल्पातुन मोठ्या प्रमाणात मुरूम, वाळू, मातीचा अवैध उपसा केला जातो. उन्हाळ्यात येथे पोहण्यासाठी तरुणांची वर्दळ असते. शहरात मित्राकडे आलेल्या मुंबईच्या तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्याने आपला जीव गमवावा लागल्याने, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

Back to top button