औरंगाबाद : पैठणखेडा येथे जमीन वाटणीच्या वादातून महिलेची आत्महत्या | पुढारी

औरंगाबाद : पैठणखेडा येथे जमीन वाटणीच्या वादातून महिलेची आत्महत्या

पैठण; पुढारी वृत्तसेवा : जमीन वाटणीच्या कारणावरून सासरच्या मंडळीकडून सतत मानसिक व शारीरिक त्रास होत असल्यामुळे महिलेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना पैठण तालुक्यातील पैठणखेडा येथे शुक्रवारी घडली. संगीता बाबासाहेब अवधूत ( वय ४० रा. पैठणखेडा, ता. पैठण) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध बिडकीन पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पैठणखेडा येथे जमीन वाटणीच्या कारणावरून संगीता अवधूत या विवाहितेला नेहमी विठ्ठल सूर्यभान अवधूत, रुक्मिणी विठ्ठल अवधूत, आबासाहेब विठ्ठल अवधूत, सुनिता आबासाहेब अवधूत (सर्व रा. पैठणखेडा) व वर्षा सुदाम काजळे (रा. जोगेश्वरी, रांजणगाव ता. गंगापूर) हे त्रास देत होते.

या त्रासाला कंटाळून संगीता यांनी शुक्रवारी विषारी औषध प्राशन केले. त्‍यांना औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात  दाखल करण्‍यात आले. उपचारादरम्यान त्‍यांचा मृत्यू झाला. संगीता यांचा  मुलगा कार्तिक बाबासाहेब अवधूत याच्या तक्रारीवरुन पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली  बीट जमादार एस. कदम तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button