ऐकावे ते नवलच! औरंगाबादमध्ये पावसाळ्यात घरात पाणी शिरते म्हणून घरच हवेत उचलले! | पुढारी

ऐकावे ते नवलच! औरंगाबादमध्ये पावसाळ्यात घरात पाणी शिरते म्हणून घरच हवेत उचलले!

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडतात. त्यासाठी विविध उपाययोजना देखिल केल्या जातात. पण पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याला वैतागून जमिनीवरील दोन हजार चौरस फुटांचा बंगला चक्क हवेत उचलण्यात आला. ही घटना औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील आनंद कुलकर्णी यांनी ११ वर्षांपूर्वी घर बांधले; पण उताराचा भाग असल्याने दरवर्षी पावसाळ्यात घरात पाणी यायचे. वैतागलेल्या कुलकर्णी यांनी हाऊस लिफ्टि करण्याचा म्हणजे जमिनीपासून ते चार फूट वर उचलण्याचा मार्ग निवडला. हरियाणातील एजन्सीच्या मदतीने हे घर वर उचलण्यात आले आहे.

साडेचार लाखांचा खर्च

कुलकर्णी यांना घर वर घेण्यासाठी साडे चार लाख रुपयांचा खर्च लागत आहे. हाऊस लिफ्टिंगसाठी प्रतिचौरस फुटांचा खर्च हा सरासरी २३० रुपये इतका आहे. यामध्ये घर चार फूट वर उचलून दिले जाते. यापेक्षा अधिक घर वर घ्यायचे असेल तर पुढील प्रत्येक फुटाला ५० रुपये जादा खर्च येतो, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

अडीचशे जॅकचा वापर

हाऊस लिफ्टिंगसाठी या ठिकाणी २५० जॅकचा वापर करण्यात आला आहे. आधी घराच्या भिंतींच्या बाजूंनी दोन-दोन फूट खोदकाम करण्यात आले. बिम लागले, की मग खाली एकेक करून जॅक लावले. त्यानंतर गाडी जशी वर उचलतात तसे हळूहळू या जॅकने घर वर उचलले. गाडीचे चाक बदलण्यासाठी जे जॅक वापरले जातात, तसेच हे जॅक आहेत. मात्र, त्यांची क्षमता खूप अधिक असते, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button