ओबीसींना मिळाला न्याय! मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर होणार सन्मान | पुढारी

ओबीसींना मिळाला न्याय! मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर होणार सन्मान

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : गोपीनाथ गडावरुन दरवेळी समाजातील वंचित, पीडित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान करण्यात येतो. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने आतापर्यंत लोकोपयोगी आणि सामाजिक उपक्रम राबवून एक आदर्श पायंडा घातला आहे. दरवर्षी गोपीनाथ गडावर एक संकल्प घेतला जातो आणि तो वर्षभर राबवला जातो. ओबीसींच्या आरक्षणाचा लढा महाराष्ट्रात सुरू आहे. मध्य प्रदेश सरकारने ओबीसींना न्याय दिला आहे. यामुळे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर सन्मान करुन एक व्यापक संदेश देण्यात येणार असल्याचे भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मुख्य कार्यक्रमापुर्वी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

एका बाजूला महाराष्ट्रात ओबीसींना न्याय मिळावा यासाठी लढा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश या राज्यात ओबीसींना न्याय देणारे शिवराजसिंह चौहान गोपीनाथ गडावर येणार असुन त्यातून खुप मोठा संदेश जाणार आहे. गोपीनाथ गडाच्या व्यासपीठावर नेहमीच वंचित, उपेक्षित, शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य माणसाला न्याय मिळतो. त्यांच्या प्रश्नावर चर्चा होते. अशा व्यासपीठावर ओबीसींना न्याय देणार्‍या मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा सन्मान करण्यात येणार आहे असे भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आज शुक्रवारी दुपारी ३‌. ३० वाजता गोपीनाथ गडावर येत आहेत. हा स्मृती दिन “संघर्षदिन सन्मान” म्हणून साजरा केला जात असुन सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योगपती पद्मश्री मिलिंद कांबळे, गोरक्षक पद्मश्री सय्यद शब्बीर, मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रिती पाटकर व इतर मान्यवरांचा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात येणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button