बीड : भरधाव कारची रिक्षाला धडक; भीषण अपघातात चार ठार तर आठ जखमी | पुढारी

बीड : भरधाव कारची रिक्षाला धडक; भीषण अपघातात चार ठार तर आठ जखमी

केज (बीड); पुढारी वृत्तसेवा : केज आंबेजोगाई रोडवर आंबेजोगाईकडे जात असलेल्या रिक्षाला भरधाव वेगात येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षा चालकासह चार प्रवासी जागीच ठार असून आठजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी ( दि.२) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

या बाबतची माहिती अशी की, दि. २ जून गुरुवार रोजी केज येथील धारूर रोड जवळील भवानी माळ वस्तीवर राहत असलेले शिकलकरी समाजातील नागरिक हे त्यांच्या समाजातील चरणसिंग गोके यांच्या अंत्यविधी नंतरचे क्रियाकर्मचा कार्यक्रम आटोपून सायंकाळी ५:०० वा च्या दरम्यान अंबाजोगाईकडे रिक्षा क्र. (एम एच-२३/एक्स-५२२९) जात असताना चंदनसावरगाव ते होळच्या दरम्यान गोसाव्याचे शेत नावाने ओळखल्या जात असलेल्या शेताजवळ अंबाजोगाई कडून येणाऱ्या एका भरधाव वेगतील चारचाकीगाडीने ( क्र.एम एच १६ सी एन ७००) या गाडीने जोराची धडक दिली.

हा अपघात एवढा भयानक होता की, रिक्षाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या आणि रिक्षातील मच्छिंद्रसिंग ग्यानसिंग गोके, प्रिया दीपकसिंग गोके, वीरसिंग दीपकसिंग गोके (रा. केज) आणि रिक्षा चालक बालाजी मुंडे (रा. पिसेगाव) हे चारजण जागीच ठार झाले. तर हरजितसिंग बादलसिंग टाक, चंदाबाई बादलसिंग टाक, मालासिंग दुर्गासिंग (रा. जालना), दीपकसिंग मच्छिंद्रसिंग गोके, गोविंदसिंग मच्छिंद्रसिंग गोके (रा. भवानी नगर, केज) आणि इतर तिघे असे आठ गंभीर जखमी झाले आहेत. सहा जखमींवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत. यामध्ये दोघांची परिस्थिती गंभीर असल्या कारणाने त्यांना लातूर येथे हलविले असल्याची माहिती अंबाजोगाई रुग्णालयातून मिळाली आहे.

Back to top button