हिंगोली : छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या | पुढारी

हिंगोली : छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील उटी ब्रम्हचारी येथे छेडछाडीला कंटाळून विषारी औषध पिलेल्या अल्पवयीन मुलीचा औरंगाबाद येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.28) रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला. अजय समाधान इंगोले व शिवाजी पांढरे अशी आरोपींची नावे आहे.

सेनगाव तालुक्यातील उटी ब्रम्हचारी येथे एका अल्पवयीन मुलीची गावातील अजय इंगोले व शिवाजी पांढरे हे दोघे छेड काढत होते. सदर मुलगी गावात किंवा शाळेत जात असताना दोघेही तिचा पाठलाग करून तिला त्रास देत होते. या संदर्भात तिच्या कुटुंबियांनी यापुर्वी या आरोपींच्या घरी माहिती देखील दिली होती. मात्र त्यानंतरही त्यांच्याकडून होणारा त्रास कमी होत नव्हता. या दोघांच्या त्रासाला कंटाळून त्या मुलीने बुधवारी (दि.२५) विषारी औषध पिले होते.

तिला तातडीने उपचारासाठी सेनगाव येथे दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच त्या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्या मुलीचे वडिल ज्ञानेश्वर साळवे यांनी शनिवारी सेनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अजय इंगोले व शिवाजी पांढरे यांच्या विरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक रणजित भोईटे याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. अल्पवयीन मुलीच्या मृत्यूनंतर सेनगाव पोलिस ठाण्यात अजय इंगोले व शिवाजी पांढरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही फरार झाले आहेत. सेनगाव पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button