लातूर : बंधाऱ्यात बुडून तीन मुलांचा करुण अंत; मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ | पुढारी

लातूर : बंधाऱ्यात बुडून तीन मुलांचा करुण अंत; मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ

जळकोट ; पुढारी वृतसेवा

लातूर जिल्ह्यातील लाळी खूर्द (ता. जळकोट ) येथे एका लग्न समारंभासाठी आलेल्या तीन मुलांचा कोल्हापूरी बंधाऱ्यात बुडाल्याने करुण अंत झाला. ही दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. एकनाथ हाणमंत तेलंगे (वय -15, रा. उदगीर), चिमा बंडू तेलंगे (वय 15 ), संगमेश्वर बंडू तेलंगे (वय13) दोघेही रा. चिमेगाव जि. बिदर अशी मृत मुलांची नावे आहेत. मृतातील दोघे हे सख्खे भाऊ आहेत. शोकाच्या सावटाखाली हा विवाह सोहळा पार पडला. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

लाळी खूर्द येथील तुळशीराम तेलंगे यांच्या मुलीचा विवाह सोहळा आज गावातच आयोजित करण्यात आला होता. घरी पाहुण्यांची मोठी गर्दी असल्याने आंघोळीसाठी म्हणून बाहेरगावाहून आलेली पाहुणे मंडळींतील काही मुले लाळी खूर्द येथे तिर नदीवर असलेल्या कोल्हापूरी बंधा-यावर गेली होती. दोन मुले पोहण्यासाठी बंधा-यात उतरली. त्याचवेळी त्यांनी अन्य एका मुलास बंधा-यात येण्यास सांगितले आणि येथेच घात झाला. ज्याला पोहता येत नव्हते, त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात तिघेही बंधा-यात बुडाली. त्या मुलांसोबत गेलेल्या मुलांनी गावात येऊन या घटनेची माहिती देताच गावकरी बंधा-याकडे धावले तथापि त्याठीकाणी पोहचेपर्यंत उशीर झाला होता.

आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहचत बंधाऱ्यातून तिघांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर हे मृतदेह ग्रामीण रुग्णालय, जळकोट येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच उप-विभागीय पोलीस अधिकारी बालाजी लंजिले, जळकोटचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, वाढोणा (बु ) चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण, पोहेकॉ रमेश मिटकरी हे घटनास्थळी पोहचत त्यांनी पुढील कार्यवाही केली.

हेही वाचा :

Back to top button