लातूर : वाळू माफियांनी शेतकऱ्याच्या अंगावर घातला ट्रॅक्टर; किल्लारी येथील घटना | पुढारी

लातूर : वाळू माफियांनी शेतकऱ्याच्या अंगावर घातला ट्रॅक्टर; किल्लारी येथील घटना

औसा ; पुढारी वृत्तसेवा : अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी शेतकऱ्याच्या अंगावर वाळूचा ट्रॅक्टर घातल्याची घटना औसा तालुक्यातील (लातूर)  किल्लारी येथे घडली. शेतीच्या दरडीचा अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला होता. संबंधित शेतकरी यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. रामानंद बिराजदार असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी किल्लारी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादू पांढरे, सुधाकर दंडगुले, दिलीप दंडगुले, मधुकर दंडगुले अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना २७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी दिलीप दुंडगुले हा आरोपी फरार आहे.

किल्लारी येथील शेतकरी बाळू बिराजदार यांच्या तेरणा नदीकाठच्या शेतामध्ये काम करीत होते. यावेळी महादू पांढरे, सुधाकर दंडगुले, दिलीप दंडगुले, मधुकर दंडगुले यांनी दरडीची वाळू काढली. त्यांचा वाळूने भरलेला ट्रॅक्टर शेतकरी बाळू बिराजदार यांनी अडवला असता आरोपी महादू पांढरे व दिलीप दंडगुले यांनी त्यांना दरडावले. त्यावेळी शेतकरी बाळू बिराजदार यांनी आपला मुलगा रामानंद (राम) बिराजदार यास फोन करून बोलावले. यानंतर रामानंद याने वाळू उपसा करणाऱ्यांना जाब विचारला. यावर त्याला व त्याच्या वडिलास वाळू माफियांनी मारहाण केली व ट्रॅक्टर चालकाला अंगावरून ट्रॅक्टर घालण्यास सांगितले. ट्रॅक्टर चालकाने रामानंद यांना जीवे मारण्याचा उद्देशाने अंगावरून ट्रॅक्टर घातला. यामध्ये रामानंद यांच्या पोटाला, हातावर व डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि सुनील गायकवाड हे करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button