पैठण : अनोळखी तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ | पुढारी

पैठण : अनोळखी तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ

पाचोड; पुढारी वृत्तसेवा: एका तीस ते पस्तीस वयोगटातील अनोळखी तरुणाचा अर्धवट जळालेल्या मृतदेह सापडल्याची घटना आज सकाळी पाचोड पैठण रस्त्यावरील असलेल्या थेरगाव गावाजवळ उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.  संबंधितांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियावरुन जनतेला आवाहन केले आहे. या प्रकरणी तूर्तास पाचोड (ता.पैठण) पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

या घटनेविषयी अधिक माहिती की, थेरगाव येथील ग्रामस्थ पहाटे माँर्निग वाँकसाठी गेले हाेते. थेरगाव फाट्यापासून काही अंतरावर असणाऱ्या गाडेकर वस्ती शिवारातील रस्त्यावरील पुलाजवळच्या नाल्यात एका अंदाजे ३०- ३५ वयोगटातील तरुणाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याथेरगावसह आसपास शेतवस्तीवरील राहणाऱ्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या संख्येने गर्दी केली.

यानंतर पाचोड पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत गर्दीला हटविले. घटनास्थळाचा पंचनामा करून  नागरिकांच्या मदतीने मृतदेह गाडीत घालून पाचोड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी बाबासाहेब घुगे पंचासमक्ष उत्तरीय तपासणी करून मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला. अज्ञात व्यक्तीची ओळख पटेपर्यंत मृतदेह औरंगाबाद येथील शासकीय (घाटी) रुग्णालयातील शीतगृहात ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिला आहे.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

मृतदेहाची तपासणी केली असता तरुणाचा खून करुन  पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्‍याचा मृतदेह अर्धवट जाळला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे.

तपास जिल्हा पोलिस अधीक्षक मनीष कवालिया, पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहूल यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सूरवसे करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button