ब्रेकिंग! लातुरमध्ये आई, मुलीसह ५ ऊसतोड महिला कामगारांचा तलावात बुडून मृत्यू - पुढारी

ब्रेकिंग! लातुरमध्ये आई, मुलीसह ५ ऊसतोड महिला कामगारांचा तलावात बुडून मृत्यू

अहमदपूर ; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील तुळशीराम तांडा येथील तलावात ५ ऊसतोड महिला कामगारांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. मृत महिला शेजारील पालम तालुक्यातील रामपूरतांडा व मोजमाबाद या गावच्या रहिवासी आहेत. मृतांमध्ये दोन सख्ख्या बहिणीचा व त्यांच्या आईचा समावेश आहे.

मृतांमध्ये राधाबाई धोंडीबा आडे (वय ४५), दीक्षा धोंडीबा आडे (वय १९), काजल धोंडीबा आडे (वय १७, रा. रामपूर तांडा, ता.पालम) अरूणा गंगाधर राठोड (वय २५), सुषमा संजय राठोड (वय २१, रा. मोजमाबादतांडा ता.पालम) यांचा समावेश आहे.

उजना (ता. अहमदपूर) शिवारातील एका शेतात हे सर्व ऊसतोड कामगार ऊसतोड करत होते. त्याच शिवारात त्यांचा मुक्काम होता. जवळच आसलेल्या तुळशीरामतांडा शिवारातील पाझर तलावात धुणे धुण्यासाठी या महिला गेल्या होत्या. त्यातील एकजण पाण्यात बुडत असताना तिला वाचविण्यासाठी इतर चार महिला पाण्यात उतरल्या. व एकमेकींना वाचविण्याच्या प्रयत्नात सर्व जण पाण्यात बुडाल्या. त्यातच त्यांचा दुदैवी अंत झाला. ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. किनगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

हेही वाचलंत का ?

 

Back to top button