औरंगाबाद शहरातील पाणीपट्टीत ५० टक्के कपात; पालकमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा | पुढारी

औरंगाबाद शहरातील पाणीपट्टीत ५० टक्के कपात; पालकमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शहरात भर उन्हाळ्यात नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागांना आठ तर काही वसाहतींना दहा दिवसानंतर पाणी मिळते, अशा स्थितीत ज्या प्रमाणात पाणी मिळते त्याच प्रमाणात पाणीपट्टी असावी, अशी मागणी नागरिकांची होती, यावर शुक्रवारी (दि.१३) पाणीपुरवठ्यासंदर्भातील बैठकीसाठी शहरात आलेले पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद शहरातील पाणीपट्टीत दोन हजार रुपयांची (५० टक्के) सवलत देण्याची घोषणा केली. समाधानकारक पाणी मिळेपर्यंत हा दर कायम राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाण्यासाठी शिवसेनाही मैदानात उतरली असताना पालकमंत्री देसाई यांनी घेतलेला हा निर्णय राजकीय असल्याचे मानले जात आहे.

औरंगाबाद शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, शहरातील सिडको, हडको, गारखेडा परिसर तसेच जुन्या शहरातील अनेक वसाहतींना आठवड्यातून एक वेळा तर काही ठिकाणी दहा दिवसानंतर पाणी मिळते, एकीकडे कमी पाणी मिळत असताना महापालिका प्रशासनाकडून पाणीपट्टी मात्र पूर्ण वसूल करण्यात येत होती, ४ हजार ५० रुपये असलेली पाणीपट्टी कमी करावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडे होती, त्यावर आता पालकमंत्री देसाई यांनी मोठा निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा दिला आहे.

शुक्रवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहरातील पाणीपुरवठा संदर्भात विविध ४२ मुद्द्यांवर स्मार्ट सिटी कार्यालयात आढावा घेतला. या बैठकीत अधिकाऱ्यांनी येत्या आठवड्याभरात १५ एमएलडी पाणी शहरासाठी कसे वाढवण्यात येईल या विषयीची माहिती पालकमंत्र्यांना दिली, यावेळी देसाई यांनी शहरात पाण्याचे समान वाटप झालेच पाहिजे असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच खासगी विहिरी, बोअरवेल्स अधिगृहित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.

पाण्यासाठी समन्वय समिती

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी समिती तयार करण्यात आली असून या समितीमध्ये पाणीपुरवठा विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांचा समावेश राहणार असल्याची माहिती देसाई यांनी दिली.

फडणवीस यांनी आंदोलनापुर्वी माहिती घ्यावी

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे २३ मे रोजी औरंगाबाद शहरात पाणीप्रश्नी मोर्चा काढणार आहेत, यावर देसाई म्हणाले की, शहरातील प्रशासन चांगले काम करत आहे. शहरात पाण्यासंदर्भात प्रामाणिक काम सुरु आहे. फडणवीस यांनी माहिती घ्यावी, अधिकाऱ्यांनीही त्यांना पाणीपुरवठ्याबद्दल माहिती द्यावी असेही देसाई यांनी सांगितले.

Back to top button