RBI चा सामान्यांना झटका! आरबीआयने रेपो दर वाढवला, होम आणि ऑटो लोन महागणार | पुढारी

RBI चा सामान्यांना झटका! आरबीआयने रेपो दर वाढवला, होम आणि ऑटो लोन महागणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बुधवारी प्रदीर्घ कालावधीनंतर अचानक रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली. आता रेपो दर एका झटक्यात 0.40 टक्क्यांनी वाढून 4.40 टक्के झाला आहे. त्यामुळे स्वस्त कर्जाचे युग आता संपले आहे. रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेमुळे लोकांवर ईएमआय (EMI)चा बोजा वाढणार आहे.

अचानक झाली आरबीआयची बैठक

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी अचानक पत्रकार परिषद घेतली. गव्हर्नर दास यांनी परिषदेत सांगितले की, रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने अर्थव्यवस्थेतील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत एमपीसीच्या सदस्यांनी एकमताने रेपो दरात 0.40 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. अनियंत्रित महागाईमुळे एमपीसीने हा निर्णय घेतल्यचे दास म्हणाले.

या घटकांमुळे महागाई अनियंत्रित

आरबीआय गव्हर्नर म्हणाले, मार्च 2022 मध्ये किरकोळ महागाई झपाट्याने वाढली आणि 7 टक्क्यांवर पोहोचली. हेडलाइन सीपीआय चलनवाढ, म्हणजे किरकोळ चलनवाढीमुळे विशेषत: अन्नधान्याची महागाई झपाट्याने वाढली आहे. याशिवाय भू-राजकीय तणावामुळेही महागाई वाढली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे गव्हासह अनेक धान्यांच्या किमती वाढल्या आहेत. या तणावाचा जागतिक पुरवठा साखळीवरही वाईट परिणाम झाल्याचे दास यांनी सांगितले.

एमपीसीची बैठक गेल्या महिन्यातच झाली होती

हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी 8 एप्रिल रोजी, आर्थिक वर्ष 2022-23 साठी रिझर्व्ह बँकेची (RBI) पहिली चलनविषयक धोरण (MPC) आढावा बैठक झाली होती. त्यावेळी, आरबीआयने सलग 11 व्या बैठकीत रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जुन्या पातळीवर कायम ठेवला होता. पण बदलाचे संकेतही दिले होते. त्यावेळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले होते की, महागाई हा मोठा धोका नाही, केंद्रीय बँकेचे लक्ष आर्थिक वाढीवर आहे.

महागाईपासून दिलासा मिळणार नसल्याची आरबीआयला भीती

चालू आर्थिक वर्षात महागाईचा दबाव कायम राहण्याची अपेक्षा आहे. आरबीआयच्या मते, 2022-23 या आर्थिक वर्षात महागाई दर 5.7 टक्के राहण्याचा अंदाज आहे. शक्तीकांत दास यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की पहिल्या तिमाहीत महागाईचा दर 6.3%, दुसऱ्या तिमाहीत 5%, तिसऱ्या तिमाहीत 5.4% आणि चौथ्या तिमाहीत 5.1% असू शकतो.

Back to top button