हिंगोली : फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून चोरट्यांनी कुलूपासह पळवले साडे नऊ लाख | पुढारी

हिंगोली : फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून चोरट्यांनी कुलूपासह पळवले साडे नऊ लाख

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी शहरातील विकास नगर भागात असलेल्या एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयामध्ये चोरट्यांनी साडे नऊ लाख रुपये पळवले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत कळमनुरी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, कळमनुरी येथील विकास नगर येथे स्पंदना फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. बचत गट व इतरांना दिलेल्या कर्जाच्या हप्त्याची दररोज वसुली या कार्यालयाकडून होत आहे. नेहमीप्रमाणे कर्ज हप्त्याची वसूलीची सुमारे साडेनऊ लाख रुपये रक्कम तिजोरीत ठेवली होती. दरम्यान रात्री चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून सुमारे साडेनऊ लाख रुपयेसह तिजोरी पळवली. तसेच चोरट्यांनी दरवाजाचे कुलूपही सोबत नेले.

दरम्‍यान, सोमवारी सकाळी कार्यालयाचा दरवाजा उघडा असल्याचे काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. तसेच त्‍यांना कार्यालयातील तिजोरी गायब असल्याचे आढळून आले. कर्मचा-यांनी तात्‍काळ घटनेची माहिती कळमनुरी पोलिसांना दिली. पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील निकाळजे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार बालाजी बोके, संभाजी लकुळे, भगवान आडे, किशोर सावंत यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने श्वानपथकाला पाचारण केले. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्मचार्‍यांकडे चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.

हेही वाचा  

Back to top button