औरंगाबाद : उन्हाच्या तडाख्याने बाजारपेठांत शुकशुकाट | पुढारी

औरंगाबाद : उन्हाच्या तडाख्याने बाजारपेठांत शुकशुकाट

अजिंठा, पुढारी वृत्तसेवा : उन्हाचा तडाखा आणि घामाच्या धारांनी अजिंठाकर बेजार झाले आहेत. गेल्या चार दिवसापासून उष्णतेच्या लाटेचा परिणाम तीव्रतेने जाणवू लागला. परिसरातील तापमान सोमवारी ३९ अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने अजिंठा परिसरात अस्वस्थता निर्माण झाली आहे. रणरणत्या उन्हामुळे रस्ते आणि बाजारपेठांमध्ये दुपारी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उष्मामुळे अंगाची लाहीलाही होत असल्यामुळे सकाळी अकरा वाजण्याच्या आत नागरिक महत्त्वाची कामे आटोपण्यावर भर देत आहेत. त्यामुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

दरम्यान, सायंकाळी रसवंत्या, शीतपेयांची दुकाने आणि आइस्क्रीम पार्लरवर नागरिकांची गर्दी होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांना शेतातील कामे करताना उन्हाचा फटका सहन करावा लागत आहे. सद्यःस्थितीत गहू आणि हरभरा या दोन पिकांची काढणी आणि मळणीची कामे सुरू आहेत. दरम्यान तापमानामुळे हरभऱ्याचे नुकसान होऊ नये म्हणून उन्हाची पर्वा न करता शेतकरी काम करीत आहेत. तीव्र उन्हाचे चटके जाणवू लागल्याने नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत. परिणामी बाजारपेठा ओस पडत आहेत.

उन्हाचा पारा वाढल्याने दुचाकी चालविताना डोळ्यांना त्रास होत आहे . तसेच पदचाऱ्यांनाही याचा मोठा फटका सहन कराव लागत आहे. या त्रासापासून बचावासाठी चष्म्याचा वापर करावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे . सद्यःस्थितीत इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहेत. उन्हाच्या प्रखरतेत मुलांना परीक्षा केंद्र ते घर असा प्रवास भरउन्हात करावा लागत आहे. त्यामुळे परीक्षार्थींनाही उन्हाचा फटका सहन करावा लागत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button