औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांची वाळू माफियांवर धडक कारवाई; दोन ट्रॅक्टर जाळले

औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांची वाळू माफियांवर धडक कारवाई; दोन ट्रॅक्टर जाळले

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील पाटेगाव येथील गोदावरी नदीतून रात्रीच्या वेळेस अवैधरित्या वाळू उत्खनन करून तस्करी होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व ग्रामीण पोलीस अधीक्षक निमित्त गोयल, उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे यांनी गुरुवारी मध्यरात्री ४ महसूल पथकाच्या मदतीने गोपनीय पद्धतीने छापा मारला. या कारवाईत वाळू उत्खनन करणारे दोन ट्रॅक्टर जागेवर जाळून नष्ट केले. या कारवाईवेळी स्थानिक पोलीस व महसूल पथकाला अलिप्त ठेवण्यात आले होते.

अधिक माहिती अशी की, पैठण शहरालगतच्या पाटेगाव परिसरातील गोदावरी नदीतून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ४ महसूल पथकासह दोन क्रुझर, दोन इनोव्हा, एक हायवा ट्रकमधून येऊन पाटेगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात जाऊन बेकायदा वाळू उत्खनन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. ज्यावेळी पथक तिथे पोहोचले, त्यावेळी गोदावरी नदीपात्रामध्ये विना क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर, वायर रोप व यारी मशीनद्वारे क्रेनच्या सहाय्याने वाळू उपसा करताना आढळून आले.

सदर ठिकाणी अंदाजे १५० ब्रास वाळू साठा उत्खनन केल्याचे दिसून आला. सदर ट्रॅक्टर यारी, मशीन व १५० ब्रास वाळू साठा जप्त करून पाटेगाव येथील तलाठी लक्ष्मीकांत गोजरे यांच्या ताब्यात देण्यात आला. दोन ट्रॅक्टर, यारी यंत्र हे विना क्रमांकाचे बेवारस असल्याने व बेकायदेशीर उत्खनन करत असल्याने यापुढे पुन्हा वाळू उपसा करण्यासाठी वापर होऊ नये, म्हणून सदरील जागेवर ट्रॅक्टर जाळून नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news