हिंगोली : सेनगाव तहसील कार्यालयात मधमाश्यांचा नागरिकांवर हल्ला | पुढारी

हिंगोली : सेनगाव तहसील कार्यालयात मधमाश्यांचा नागरिकांवर हल्ला

सेनगाव, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव येथील तहसील कार्यालयामध्ये भिंतीवर असलेल्या मधमाशांनी आज (सोमवार) दुपारी शासकीय कामकाज सुरू असताना अचानक हल्‍ला चढवला. यात तहसिल कार्यालयातील एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून कामासाठी आलेले नागरिक सुद्धा जखमी झाले आहेत. महादेव कढाळे या कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक असून त्यांना हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

सेनगाव तहसील कार्यालयाला शनिवार व रविवार दोन दिवसाची शासकीय सुट्टी असल्यामुळे सोमवारी कामानिमित्त नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच न्यायालयाचे कामकाज देखील तहसीलच्या इमारतीतून चालत असल्याने येथे देखील नागरिक मोठ्या प्रमाणात आलेले होते. दरम्यान, तहसीलच्या इमारतीला चिकटलेल्या मधमाश्यांनी अचानक हल्ला चढवल्याने नागरिकांची धावपळ सुरू झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, या आग्यमोहळाच्या मधमाशांवर पाणी पडल्यामुळे मधमाश्यांनी मोहळावरून उठून नागरिकांवर हल्ला चढविल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनी मधमाश्यांपासून वाचण्यासाठी धावपळ सुरू केली. तर अनेकांनी मधमाशांपासून बचाव करण्यासाठी कार्यालयातील खुर्ची टेबलाचा आसरा घेतला. चावा घेणाऱ्या मधमाशा ह्या आग्या मोहोळाच्या असल्याने या हल्यात नागरिक जखमी झाले आहेत.

दरम्यान, सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू केले आहेत. तर सेनगावमधील नागरिकांनी धूराच्या सहाय्याने तहसील कार्यालयातील मधमाशांना पळवून लावले आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हि़डिओ : चला दख्खनचा राजा जोतिबाचा महिमा ऐकूया : महिमा श्री केदारलिंगाचा…

Back to top button