Hingoli : लासीना येथे आर्थिक परिस्थितीला कंटाळून तरूणाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

Hingoli : लासीना येथे आर्थिक परिस्थितीला कंटाळून तरूणाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील लासीना येथे आर्थिक परिस्थितीला कंटाळून एका तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली आहे. योगराज सहादु सोनुले ( वय 26) असे या तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Hingoli)

लासीना येथे योगराज सोनुले यांच्या वडिलांच्या नावे लासीना शिवारात दिड एकर शेत आहे. त्यांच्याघरी आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या शेतातील उत्पन्नावरच सोनुले कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र मागील काही वर्षांपासून कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतातील उत्पन्न देखील जेमतेमच येत होते. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत होता. शिवाय हाताला काम नसल्याने आर्थिक परिस्थितीही हालखीची झाली होती. (Hingoli)

दरम्यान, बुधवारी सकाळी नऊ वाजता योगराज हे घरी चहा पिऊन शेतात जाऊन येतो असे सांगून शेतात निघाले होते. काही वेळानंतर त्यांचे वडील सहादू सोनुले शेतात गेले. मात्र शेतातील झाडाला योगराज याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती बासंबा पोलिसांना देण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, जमादार प्रविण राठोड, बालाजी मरवळे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणात सहादू सोनुले यांच्या माहितीवरून बासंबा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. (Hingoli)

हेही वाचलतं का?

Back to top button