पुणे : पुढारी वृत्तसेवा
महापालिका कर्करोग रुग्णालयासाठी 700 कोटींचे आणि वारजे येथे 300 बेडचे रुग्णालय उभारण्यासाठी 350 कोटींचे कर्ज काढणार आहे. यामुळे महापालिकेच्या डोक्यावर 1 हजार 50 कोटींचा कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून तो स्थायी समितीसमोर ठेवला आहे.
शहरात महापालिकेचे 47 बाह्यरुग्ण विभाग, 18 प्रसूतिगृहे, 1 सांसर्गिक आजाराचे रुग्णालय, 1 सर्वसाधारण रुग्णालय आहे. भारतामध्ये 1 लाख लोकसंख्येमागे 90 रुग्ण कर्करोगाने त्रस्त आहेत. भारतात दरवर्षी कर्करोगामुळे 5 लाख रुग्णांचा मृत्यू होतो. कर्करोगावर उपचार सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नसतात. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून बाणेरमध्ये अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे नियोजन केले आहे. या रुग्णालयासाठी 700 कोटींचे कर्ज काढण्यात येणार आहे. याबाबचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रकल्प राबवण्यासाठी समिती तयार करण्यात येणार आहे. निविदेसाठी मान्यता मिळावी, असा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.
वारजे येथील सर्व्हे नं. 79 मध्ये मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल खासगी संस्थेमार्फत उभारणे आणि 30 वर्षे चालवण्यासाठी देण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आला आहे. यासाठी 350 कोटींचे कर्ज काढण्यात येणार आहे. निविदाधारकाने कर्ज उभारून रुग्णालय उभे करायचे आहे. यामध्ये काही बेड पूर्णपणे मोफत व काही बेड खासगी दरामध्ये पात्र निविदाधारकाकडून घेण्यात येणार आहेत. मनुष्यबळ आणि हॉस्पिटल चालवण्याची जबाबदारी निविदाधारकाची असणार आहे.
महापालिका स्वत:चे वैद्यकीय महाविद्यालय उभारत असून महाविद्यालयाची मान्यता अंतिम टप्प्यात आहे. असे असताना 1 हजार कोटी रुपये कर्ज काढून रुग्णालये उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. ही रुग्णालये खासगी संस्था चालवणार असल्यामुळे याचा फायदा नक्की कोणाला होणार? की विशिष्ट व्यक्तीसाठी निविदा राबवण्यात येत आहे, अशी शंका व्यक्त केली जात आहे. ज्या रुग्णालयांना सवलती दिल्या त्यांच्याकडून महापालिकेला योग्य सेवा मिळत नाही. यामध्ये आता दोन रुग्णालयांची भर पडण्याची शक्यता आहे.