मादळमोहीच्या उद्योजकाचे अपहरण करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या | पुढारी

मादळमोहीच्या उद्योजकाचे अपहरण करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

वडीगोद्री/गेवराई, पुढारी वृत्तसेवा

गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील  उद्योजकाचे अपहरण करून खंडणी मागितल्याची घटना घडली होती. खंडणी देण्यास नकार दिल्याने त्याला बेदम मारहाणही करण्यात आली. त्यानंतर त्याला वडीगोद्री जवळ चालत्या वाहनातून फेकून देण्यात आले होते. या घटनेचा निषेध करत व्यापाऱ्यांनी एक दिवस बाजारपेठ बंद ठेवून, अपहरणकर्त्यांना अटक करावी अशी मागणी केली होती. बीड पोलीसांनी अवघ्या तीन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावत चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या.  या कामगिरीबद्दल बीड पोलिसांचे  कौतुक होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील व्यावसायिक कैलास शिंगटे यांचे  पाच जणांनी २६ जानेवारी रोजी साठेवाडी येथून अपहरण केले. त्यानंतर त्यांना मारहाण करून १० लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून अपहरण प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा लावत चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

याप्रकरणी संतोष हनुमान धनगर (वय २६), ज्ञानेश्वर श्रावण माळी (वय २७), राम भगवान गव्हाणे (वय २४) तिघेही रा.गोपाळ वस्ती बेलगाव ता. गेवराई, तसेच विशाल बाबासाहेब जाधव रा. म्हाळस पिंपळगाव सावंगी ता. नेवासा जि. अहमदनगर यांना ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपी संजय उर्फ संज्या पवार हा फरारी आहे. ही कारवाई चकलंबा पोलीस ठाण्याचे सपोनि बी. डी. नवले, पोलीस उपनिरीक्षक डी. बी. पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक भगतसिंग दुलत,चकलंबा पोलिस कर्मचारी एस. एम. सानप,ए .ए. येळे, किशोर खेत्रे यांनी केली.

हेही वाचलं का? 

Back to top button