Maharashtra Rain LIVE Updates: खडकवासला धरण 76 टक्के भरले; लवकरच पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता; नागरिकांना इशारा
Maharashtra Rain LIVE Updates: महाराष्ट्रात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून नाशिक, रायगड, चिपळूण, महाड, वसई- विरार आणि नालासोपारा येथे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामानासंबंधी सर्व ताज्या घडामोडी या LIVE ब्लॉगमध्ये जाणून घ्या.
Pune Rain Live Updates: खडकवासला धरण 76 टक्के भरले; लवकरच पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता
खडकवासला धरणात मुसळधार पावसामुळे पाणीसाठा 76 टक्क्यांवर पोहोचला असून पुढील काही तासांत धरण 80 टक्क्यांहून अधिक भरू शकते. त्यामुळे धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता असून, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे आणि जनावरे व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे पाटबंधारे विभागाने आवाहन केले आहे.
Mumbai Rain Live Updates: मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्ग 19 तासांनंतर सुरू
दरड कोसळल्यामुळे बंद करण्यात आलेला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक तब्बल 19 तासांनंतर पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. दरड हटवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
मुंबईत सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट कायम आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीबाबत अधिकृत अपडेट तपासूनच घराबाहेर पडावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
Mumbai Rain Live Updates: नालासोपारा- विरारमध्ये अजूनही पाणी साचले
मुंबईत पावसाचा जोर कमी झाला असला तरी नालासोपारा आणि विरार परिसरात अनेक रस्ते, दुकाने आणि गृह संकुलांमध्ये अजूनही पाणी साचलेले आहे. काही ठिकाणी नागरिकांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागत असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Mumbai Rain Live Updates: अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला
पावसाचा जोर कमी झाल्याने अंधेरी सबवेवरील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. सध्या येथे पाणी साचलेले नसून वाहनांची नियमित ये-जा सुरू आहे.
Mumbai Rain Live Updates: मनोरी किनाऱ्यावर मानवरहित व्यापारी जहाज अडकले
उत्तर मुंबईतील मनोरी किनाऱ्याजवळ एक मानवरहित व्यापारी जहाज किनाऱ्यावर अडकले आहे. घटनेनंतर भारतीय तटरक्षक दलाने घटनास्थळी पथक पाठवले असून जहाज अडकण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Mumbai Rain Live Updates: मरीन लाइन्समध्ये पावसाचा जोर कमी
मरीन लाइन्स परिसरात आज सकाळी कोरडे रस्ते, ढगाळ वातावरण आणि जोरदार वाऱ्यांचे चित्र पाहायला मिळाले. सलग पावसानंतर नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
Mumbai Rain Live Updates: वसई रोड- विरार लोकल सेवा पुन्हा सुरू
मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेली वसई रोड ते विरार दरम्यानची लोकल रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सहकार्याबद्दल आभार मानले असून सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
Mumbai Rain Live Updates: पश्चिम रेल्वेकडून अनेक गाड्या रद्द
दरडी कोसळणे आणि पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे पश्चिम रेल्वेने पुणे-भुज, भुज-पुणे एक्स्प्रेससह काही MEMU गाड्या रद्द केल्या आहेत. विरार-सुरत सेवा वलसाड येथून सुरू करण्यात आली असून प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेची माहिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Mumbai Rain Live Updates: मुंबईच्या धरणसाठ्यात मोठी वाढ; पाणीसाठा 28.92 टक्क्यांवर
सततच्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अवघ्या 24 तासांत धरणसाठ्यात लक्षणीय वाढ होऊन एकूण साठा 28.92 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.
Mumbai Rain Live Updates: मुंबईत पावसाचा जोर कमी, ऑरेंज अलर्ट कायम
सलग सात दिवस मुसळधार पावसानंतर मंगळवारी मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शहरात रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला असून सकाळी ढगाळ वातावरण, जोरदार वारे आणि काही ठिकाणी हलक्या सरींची नोंद झाली. मात्र हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट कायम ठेवला आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.