

Maharashtra Local Body Elections Result 2025 Winner List: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून विजयी नगरसेवकांची नावे हळूहळू समोर येऊ लागली आहेत. कोकणापासून मराठवाडा, विदर्भ ते पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रापर्यंत राजकीय हालचालींना वेग आला आहे.
यंदाच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी महायुतीचे वर्चस्व दिसून येत असले, तरी अनेक नगरपरिषदांमध्ये महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांविरुद्ध उभे राहिल्याचंही चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे निकालांमध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या आघाड्यांचा प्रभाव जाणवतो आहे.
दरम्यान, जामनेर, अनगर आणि दोंडाईचा या तीन नगरपंचायतींमध्ये सर्व जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने या ठिकाणी निवडणूक न होता थेट विजयी झाले. उर्वरित 287 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आज मतमोजणी सुरु आहे.
सातारा नगरपालिकेत अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली असून, मयूर कांबळे आणि जयश्री जाधव यांना मतदारांनी स्पष्ट कौल दिला आहे. सासवड नगरपरिषदेत मात्र भाजपने जोरदार कामगिरी करत प्रभाग क्रमांक 2 आणि 9 मधील चारही जागा जिंकल्या. दिनेश भिंताडे, लिना वढणे, प्रदीप राऊत आणि प्रियंका जगताप हे भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपंचायतीत चित्र थोडं वेगळं आहे. येथे राजर्षी शाहू विकास आघाडीने सहा जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे, तर भाजप–शिवसेना युतीला तीन जागांवर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या नगरपंचायतीसाठी प्रचार केला होता, तरीही युतीला अपेक्षित यश मिळालं नाही.
पालघर जिल्ह्यातील जव्हार नगरपरिषदेत भाजप आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. येथे भाजपचे तीन नगरसेवक, शिवसेना शिंदे गटाचा एक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक उमेदवार विजयी झाला आहे.
रहिमतपूर नगरपरिषदेत राष्ट्रवादी अजितदादा गटाने मजबूत पकड राखत सात उमेदवार निवडून आणले आहेत, तर भाजपला तीन जागांवर यश मिळालं आहे. यावरून येथील स्थानिक राजकारणात राष्ट्रवादीचा प्रभाव कायम असल्याचं स्पष्ट होतं.
मुरगुड नगरपरिषदेत मात्र शिवसेना शिंदे गटाने मोठा विजय मिळवला आहे. येथे तब्बल 16 नगरसेवक शिंदे गटाकडून विजयी झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
करमाळा शहरात शहर विकास आघाडीने नगराध्यक्षपदावर आपली बाजी मारली असून, मोहिनी संजय सावंत यांचा विजय झाला आहे. या निकालामुळे करमाळ्यात स्थानिक आघाडीचं वजन वाढल्याचं मानलं जात आहे.
राज्यातील अनेक ठिकाणचे निकाल अद्याप यायचे असून, मतमोजणी जसजशी पुढे जाईल तसतशी विजयी नगरसेवकांची संपूर्ण यादी स्पष्ट होणार आहे. आजचा दिवस राज्याच्या स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार असल्याचं चित्र आहे.