

LPG Cylinder Shortage Memes Social Media: देशातील अनेक भागांत एलपीजी (LPG) सिलेंडरच्या तुटवड्याच्या बातम्या समोर येत असताना एकीकडे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. गॅस सिलेंडर मिळण्यात होत असलेला उशीर, वाढलेल्या रांगा आणि बाजारातील तणावपूर्ण वातावरण यामुळे लोक चिंतेत असले तरी इंटरनेटवर मात्र या विषयावर मीम्स बनत आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशातील काही शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरचा पुरवठा कमी झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी गॅस एजन्स्यांबाहेर नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी लोकांना तासन्तास थांबूनही सिलेंडर मिळेल की नाही, याची खात्री नाही. या परिस्थितीचा परिणाम सामान्य नागरिकांपासून ते छोट्या हॉटेल व्यावसायिकांपर्यंत सर्वांवर होत असल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. एक्स (X), फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर एलपीजी टंचाईवर अनेक मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत. काही मीम्समध्ये गॅस सिलेंडर मिळवणे आता सोने खरेदी करण्याइतके कठीण झाले असल्याचे दाखवले आहे. तर काही ठिकाणी लवकरच गॅस सिलेंडर ज्वेलरी दुकानात मिळू शकतो, अशा कमेंट केल्या जात आहेत.
काही मीम्समध्ये घरामधील आईच्या ‘जुगाड’ पद्धतीवरही विनोदी टिप्पणी करण्यात आली आहे. “गॅस असो किंवा नसो, आई काही ना काही मार्ग काढून स्वयंपाक करूनच दाखवते,” असा आशय असलेले मीम्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत. हे मीम्स पाहून अनेकजण हसत असले तरी त्यातून लोकांच्या दैनंदिन अडचणींचेही वास्तव दाखवले जात आहे.
दरम्यान, गॅस सिलेंडरच्या संभाव्य तुटवड्यामुळे बाजारात इंडक्शन कुकटॉपची मागणी अचानक वाढली असल्याचेही दिसून येत आहे. अनेक इलेक्ट्रॉनिक्स दुकानदारांच्या मते, मागील काही दिवसांत इंडक्शन स्टोव्हची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक कुटुंबांमध्ये आधी फक्त आपत्कालीन परिस्थितीत वापरला जाणारा इंडक्शन स्टोव्ह आता कायमचा वापरावा लागणार का? असा प्रश्न पडला आहे.
गॅस एजन्स्यांबाहेर लागलेल्या मोठ्या रांगाही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. काही मीम्समध्ये या रांगांची तुलना मोठ्या सेलच्या रांगांशी करण्यात आली आहे. “सिलेंडर मिळेल की नाही माहित नाही, पण लाइन मात्र सुपरमार्केट सेलसारखी दिसत आहे,” अशा प्रकारच्या मजेशीर प्रतिक्रिया नेटिझन्स देताना दिसत आहेत.
एकूणच, एलपीजी सिलेंडरच्या टंचाईमुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत असला तरी सोशल मीडियावरील मीम्समुळे लोक या परिस्थितीकडे थोड्या हलक्याफुलक्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न करत आहेत. गंभीर समस्येतही विनोद शोधण्याची नेटिझन्सची ही शैली पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.