

Laxman Hake on Mumbai Maratha Morcha
मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असतानाच यावरून ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आंदोलकांना अन्नधान्य पुरवत असून नेत्यांचे चेलेचपाटे, गावगूंड मुंबईतल्या आंदोलनात आले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
सोमवारी दुपारी लक्ष्मण हाके यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, गावात दोन नंबरचे धंदे करणारी, वाळूचे ठेकेदार, नेत्यांचे चेलेचपाटे आणि गावात दहशत निर्माण करणारी मंडळी मुंबईत आलीयेत. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, मुंबईला वेठीस धरण्याचा अधिकार कोणालाही नाही.
रस्त्यावरची लढाई ताकदीने लढू
जरांगेंची मागणी ही संविधानाच्या चौकटीला धरून नाही. मराठा समाजाचं महाराष्ट्रावर वर्चस्व आहे. ओबीसींचे अधिकार संपवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आम्ही रस्त्यावरची लढाई ताकदीने लढू तर छगन भुजबळ हे विधिमंडळातील लढाई लढतील, असं लक्ष्मण हाकेंनी सांगितले. बोगस कागदपत्रांच्या आधारे कोणी ओबीसी आरक्षणात घुसू पाहत असेल तर त्याला आमचा विरोध आहे, असंही हाके म्हणालेत.
भुजबळ यांनी सोमवारी ओबीसी समाजातील महत्त्वांच्या नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत आम्ही भुजबळांचं मार्गदर्शन घेणार आहोत, असंही हाकेंनी बैठकीपूर्वी सांगितले. मराठ्यांना सरसकट कुणबी ग्राह्य धरून ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला विरोध करण्याबाबतच्या रणनितीवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेंना महत्त्व देऊ नये. मुंबईत आलेले गावाकडचे लोक हे दोन नंबरचा धंदा करणारे लोक असून मुंबईतील लोकांना त्रास दिला जात आहे. प्रकाश सोळंके आणि विजय पंडित यांनी केलेली मागणी मान्य होणार नाही. ब्राम्हण, मुस्लिम, लिंगायत सुद्धा कुणबी आहेत. मग त्यांनाही ओबीसींमधून आरक्षण देणार का?
लक्ष्मण हाके
बैठकीला कोण कोण उपस्थित?
बैठकीला ओबीसी नेते आणि जेष्ठ मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे, लक्ष्मण गायकवाड, स्नेहा सोनटक्के, सत्संग मुंढे, धनराज गुट्टे, दौलत शितोळे, नवनाथ वाघमारे, दशरथ पाटील, दिलीप खैरे, समाधान जेजुरकर यांसह इतर प्रमुख नेते उपस्थित