कौलव; राजेंद्र दा. पाटील : वाढत्या यांत्रिकीकरणामुळे गाढवांची संख्या रोडावत असली तरी विविध कष्टाच्या कामासाठी गाढवांची मागणी वाढली आहे. डिझेल, पेट्रोलचे दर वाढल्याने यांत्रिक पद्धतीने वाहतूक करणे परवडत नाही. त्यामुळे वीटभट्टीवर गाढवांना मागणी वाढत आहे. एका गाढवापोटी दिवसाला तीनशे रुपये मजुरी दिली जाते. दिवसभर त्याच्या पाठीवरून विटा व मातीची वाहतूक केली जाते. त्यामुळे गाढवाच्या मालकांना चांगले उत्पन्न मिळत आहे. एका मालकाकडे किमान आठ ते दहा गाढवे असतात. ऑक्टोबरनंतर मे महिन्यापर्यंत वीटभट्टीवर त्यांना चांगली मागणी आहे. सांगली, सोलापूर, विजापूर जिल्ह्यातील मजूर गाढवासह कोल्हापूर जिल्ह्यातील वीटभट्ट्यांवर काम करत आहेत.
पूर्वी एका गाढवाची किंमत बारा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत होती. गाढवांचा वापर वाढल्याने हीच किंमत तीस हजारपर्यंत गेली आहे. यांत्रिकीकरण महागल्याने नेहमीच उपेक्षेचा धनी बनलेल्या गाढवाला मात्र चांगली किंमत आली आहे. मध्यंतरीच्या काळात गाढवांचा वापर कमी झाला होता. मात्र आता वीटभट्टीच्या कामासाठी गाढवांना मागणी वाढली आहे. त्यामुळे गाढवाच्या किमती वाढल्या असून आम्हाला रोजगार उपलब्ध होत आहे. शासनाने पशुसंवर्धन विभागामार्फत गाढव संवर्धन मोहीम राबवावी.
— विकास जाधव, पंढरपूर