कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धाने कोल्हापुरातील तीन घरांत अक्षरश: धाकधूक सुरू होती. दररोज चिघळत जाणार्या परिस्थितीने त्यांची काळजी वाढतच चालली होती. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मुलींनी युक्रेनची सीमा ओलांडली आणि रोमानिया देशात प्रवेश केला, त्यानंतर या पालकांचा जीव अक्षरश: भांड्यात पडला.
युक्रेनमध्ये अडकलेल्या कोल्हापूरच्या तीन मुली सुखरूप असून त्या भारतात परतत असल्याचे पालकांनी सांगितले. गंगावेश येथील आर्या चव्हाण, प्राजक्ता पाटील तर जिल्हा परिषद कॉलनी, फुलेवाडी रिंग रोड येथील ऋतुजा कांबळे या विद्यार्थिनी युक्रेनच्या चेर्निव्हस्ती येथील बुकोव्हेनीन मेडिकल युनिव्हर्सिटी येथे एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत आहेत.
अडीच महिन्यापूर्वीच त्या युक्रेनला गेल्या होत्या. युक्रेनमधील घटनांनमुळे कुटुंबीयांची घालमेल सुरू होती. घरातील सार्यांच्या नजरा युक्रेनकडेच होत्या. कुटुंबीय त्यांच्या संपर्कात होते. मुलीही पालकांना काळजी करू नका, असे सांगत धीर देत होत्या. युक्रेनची राजधानी कीव्हपासून पश्चिमेकडे सुमारे 500 कि.मी. अंतरावर आम्ही आहोत. या ठिकाणी अद्याप युद्धजन्य परिस्थिती नसल्याचे त्या सांगत असल्या तरी दररोज येणार्या युद्धाच्या बातम्यांनी पालकांची चिंता वाढतच चालली होती.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार या परिसरातील विद्यार्थ्यांना रोमानियामार्गे भारतात आणले जाणार आहे. या तीन विद्यार्थिनी आज रोमानियाच्या दिशेने निघाल्या. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांनी युक्रेनची सीमा ओलांडून रोमानियाच्या हद्दीत प्रवेश केला. त्यांनी रोमानियाच्या हद्दीत प्रवेश करताच पालकांच्या चिंतातूर चेहर्यावर आनंदाचे भाव आलेे. शनिवारी त्या भारतात येतील आणि रविवार अथवा सोमवारी त्या कोल्हापुरात पोहोचतील, अशी शक्यता आहे.