

अनुराधा कदम, कोल्हापूर
विधानसभा निवडणुकीचे रण चांगलेच तापले आहे. उमेदवारांचे किंबहुना पक्षांचे भवितव्य मतपेटीत बंद होण्यासाठी उणेपुरे 11 दिवस उरले आहेत. मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीसह सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. राज्यात महिला मतदारांचा टक्का आपल्या बाजूने वळवण्यासाठी पक्षीय नेतृत्वाने प्रचारात महिलांविषयक योजनांचा डंका वाजवायला सुरुवात केली आहे. पक्षांच्या जाहीरनाम्यातही महिलांविषयक योजनांची चढाओढ आहे. त्यामुळे निवडणूक जिंकण्याआधी पुरुष मतदारांच्या तुलनेत जवळपास 47 टक्के संख्या असलेल्या महिला मतदारांचे मन जिंकण्याची लढाई जोमाने सुरू आहे.
प्रचाराची रणनीती आखताना महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन पक्षीय राजकारणाचा कणा बनत चालला आहे. आता कुटुंबातील प्रमुखाने सांगायचे आणि महिलेने मत द्यायचे, हे चित्र बदलले आहे. महिला त्यांचे मत स्वत:च्या निर्णयावर ठरवत आहेत. त्यामुळेच सरकारच्या धोरणांमध्ये महिलांचे प्रश्न, योजना, सुविधा या बाबी अग्रक्रमावर विचारात घेतल्या जातात. त्याचेच पडसाद सध्याच्या निवडणूक प्रचारात दिसू लागले आहे. राज्यात एकूण 9 कोटी 70 लाख 29 हजार 119 मतदारांपैकी 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 इतक्या महिला मतदार आहेत.
महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीत महिलांसाठी योजना
महायुतीची रणधुमाळी लाडकी बहीण योजना गाजवतेय
प्रचारात महिलांविषयक धोरणांचा मुद्दा ठळक
स्टार प्रचारकांकडून महिलांच्या प्रश्नांवर भर
महायुतीकडे लाडकी बहीण योजनेचे कार्ड
रक्षाबंधनाची ओवाळणी असा भावनिक आशय देत महायुतीने तीन महिन्यांपूर्वी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत दरमहा पात्र महिलांना दीड हजार रुपये देण्यात आले. यापुढेही युतीला साथ दिली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू, अशी टॅगलाईन घेत प्रचारात लाडकी बहीण योजनेचे कार्ड फिरवले जात आहे. तसेच युवतींना शैक्षणिक सुविधा, एसटी तिकीटदरात 50 टक्के सवलत, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमध्ये सवलतीची अन्नपूर्णा योजना या सुविधांवर आधारित महायुतीचा प्रचार सुरू आहे.
महाविकास आघाडीच्या निवडणूकपूर्व जाहीरनाम्यातील पंचसूत्रीत महिलांसाठी महालक्ष्मी योजना सुरू करणार, असे म्हटले आहे. या योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये दिले जातील, असे वचन लिहिले आहे; तर महिलांना मोफत बस प्रवास, युवतींना शिक्षणात आर्थिक सवलत देणार असल्याचा मुद्दा मांडला आहे. महिलांचे बजेट कोलमडणार्या महागाईला आळा घालणार, असेही आश्वासन सध्या महाविकास आघाडीच्या प्रचारात दिले जात आहे.