क्रीडानगरीचे ‘ऐश्‍वर्य’ पोहोचलेे विम्बल्डनमध्ये

क्रीडानगरीचे ‘ऐश्‍वर्य’ पोहोचलेे विम्बल्डनमध्ये
Published on
Updated on

कोल्हापूर : सागर यादव जगातील चार ग्रँडस्लॅमपैकी सर्वात महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी स्पर्धा म्हणजे इंग्लंडची विम्बल्डन स्पर्धा. या स्पर्धेत खेळण्याची संधी कोल्हापूरची उगवती टेनिस स्टार ऐश्‍वर्या जाधव हिला लाभली. हिरवळीवर खेळल्या जाणार्‍या या स्पर्धेत तिला चार सामने गमवावे लागले असले तरी आयुष्यभर उपयोगी पडेल असा अनुभव तिने गाठीशी आणला आहे. तिच्या रूपाने कला आणि क्रीडानगरी असलेल्या कोल्हापूरचे नाव लंडनच्या आसमंतात झळाळले.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भक्‍कम प्रोत्साहन आणि पाठबळामुळे कोल्हापूरची क्रीडा परंपरा विकसित झाली. यामुळे गेल्या शंभर वर्षांत पारंपरिक खेळापासून ते आधुनिक गेम्सपर्यंत कोल्हापुरातील खेळाडूंनी राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवून राज्यासह देशाच्या लौकिकात भर घातली. यातलाच एक चमकता तारा म्हणजे लॉन टेनिसपटू ऐश्‍वर्या जाधव होय.

ग्रामीण भागातील ऐश्‍वर्या जाधवने अल्पावधीत राज्य-राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी घोडदौड करत आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतली आहे. इंग्लंड येथे होणार्‍या विम्बल्डन स्पर्धेच्या 14 वर्षांखालील गटात ऐश्‍वर्याने नुकतेच आशियाई संघाचे प्रतिनिधित्व केले. इतकेच नव्हे तर या स्पर्धेत लहान वयात सहभागी होणारी ती एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे.

विम्बल्डन येथील स्पर्धेत ऐश्‍वर्याला पाच सामने खेळण्याची संधी मिळाली. यापैकी एका सामन्यात पुढे चाल देण्यात आली. उर्वरित चार सामन्यांत ऐश्‍वर्याने प्रतिस्पर्धी खेळाडूंना अटीतटीची झुंज दिली. मात्र, प्रोफेशनल व अनुभवी खेळाडूंच्या विरुद्ध तिला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा खेळण्याचा अनुभव तिला पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचा ठरणारा आहे.

अल्पावधीतच्या ऐश्‍वर्याने 10 वर्षांखालील गटात राज्यस्तरावर दुसरे तर देशपातळीवर 12 वयोगटात 6 वे स्थान पटकाविले. देशपातळीवर 14 वर्षांखालील गटात प्रथम क्रमांकाचे मानांकनही मिळविले. ऐश्‍वर्या कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन (केडीएलटीए) व अर्शद देसाई अ‍ॅकॅडमीची खेळाडू असून छत्रपती शाहू विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. दररोज सकाळी व सायंकाळी दोन-दोन तास सरावाबरोबरच अभ्यासातही ऐश्‍वर्या हुशार आहे. तिला प्रशिक्षक अर्शद देसाई व मनाल देसाई आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.

विम्बल्डन स्पर्धेत सहभागी झालेनंतर तिच्या अनुभवाचा एक छोटेखानी व्हिडीओ विम्बल्डनच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात तिने म्हंटले आहे की, या स्पर्धेसाठी आशियातून फक्‍त चौघी आणि भारतातून मी फक्‍त एकटी सहभागी झाले होते. ज्या स्पर्धेत जगातील दिग्गज खेळाडू सहभागी होतात, त्यात खेळण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी भाग्याचे आणि माझ्या देशासाठी अभिमानाचे आहे. येथे मला जो अनुभव मिळाला, जे ज्ञान मिळाले ते लाखमोलाचे आहे. कोल्हापूरचे नाव विम्बल्डनच्या इतिहासाच्या पानावर कोठे तरी नोंदले गेले याचा मला अभिमान आहे.

शेतकरी कुटुंबातील कन्या…

यवलूज (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील शेतकरी जाधव कुटुंबात 4 ऑक्टोबर 2008 ला जन्मलेल्या ऐश्‍वर्याने आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे सीनिअर केजीपासूनच लॉन टेनिस खेळण्यास सुरुवात केली. मुलांचे शिक्षण आणि ऐश्‍वर्याला टेनिस खेळात करिअर करता यावे यासाठी जाधव कुटुंबीयांनी यवलूज गाव सोडून शहरात राहण्याचा निर्णय घेतला. सध्या जाधव कुटुंबीय सर्किट हाऊस परिसरात भाड्याच्या घरात राहतात. वडील दयानंद जाधव लॅण्ड सर्व्हेअर तर आई सौ. अंजली जाधव गृहिणी आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news