कोल्हापूर; गौरव डोंगरे : चोरट्यांचा सुळसुळाट : नागाळा पार्क परिसरालगत एका पाण्याच्या रिकाम्या टाक्या विक्रेत्याच्या काही सिंटेक्स टाक्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. त्याने त्या परत मिळवण्यासाठी एक शक्कल लढवली.
सिंटेक्स टाकी शोधून आणा… पाचशे रुपये मिळवा. मग, काय अनेक रिकामटेकडे भर महापुरात शोधमोहिमेला उतरले; पण काही चोरट्यांनी याचा गैरफायदा घेत दिवसा टाकी शोधत फ्लॅटची रेकी करून 8 ते 10 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. यामुळे चोरट्यांचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा फटका अनेकांना बसलाय. प्रापंचिक साहित्य, वाहने, जनावरे, शेतीचे नुकसान सहन करावे लागले आहे.
मात्र, याच पूरस्थितीचा गैरफायदा घेणार्या काही चोरट्यांनी भागातील बंद फ्लॅट, बंगले, मंदिरातील दान पेट्यांसहित दुचाकीही पळवून नेल्या आहेत.
शहरातील नागाळा पार्कात एक अजबच प्रकार घडला. परिसरात सिंटेक्स टाकी विक्रेत्याच्या रिकाम्या टाक्या पुरात वाहून गेल्या. त्या परत मिळविण्यासाठी त्याने, 'टाकी शोधा पाचशे रुपये मिळवा,' अशी आवातनी ठोकली. हे ऐकून अनेकजण टाक्यांच्या शोधत पुराच्या पाण्यातून फिरत होते.
नागाळा पार्क येथील एका इमारतीच्या आवारात असणारी पाण्याची टाकी काहींनी पळवून नेतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
रिकाम्या टाक्यांच्या शोध घेण्याचा बहाणा करून काही जण नागळा पार्क, अक्षय पार्क, दीप्ती पार्क, रमणमळा, सन सिटी या परिसरात दिवसाढवळ्या फिरत होते. याचाच फायदा घेत एका टोळीने दिवसा परिसराची रेकी करून रात्री बंद फ्लॅट लक्ष्य केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन संशयित चोरट्यांना बेड्या ठोकल्यावर हा प्रकार पुढे आला आहे.
महापुराच्या काळात चोरट्यांनी शिरोळ येथील अष्टविनायक मंदिरातील दानपेटी पळविली. पुराचे पाणी घराजवळ आल्याने एकाने कोल्हापूर जिल्हा परिषदेजवळ फुटपाथवर लावलेली दुचाकी चोरीला गेली आहे. तर, दसरा चौक परिसरात एका शिक्षण संस्थेत जवळच असणार्या खोलीतील इलेक्ट्रिक साहित्य चोरटे नेतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.