कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
सुमारे 31 वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून साकारलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या चांदीच्या मूर्तीची मंदिरातील गरुड मंडपात प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. त्यानुसार कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढून ती 'देवस्थान'कडे सुपूर्द करण्यात येणार आहे. मंगळवार, दि. 1 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता देवीच्या पारंपरिक रथोत्सव मार्गावरून मूर्तीची मिरवणूक निघणार आहे. यानंतर शुक्रवार, दि. 4 मार्च रोजी मूर्तीवर महायज्ञ, अभिषेक होणार आहे.
अंबाबाई देवीच्या मूळ दगडी मूर्तीची झीज झाल्याने अभिषेकाकरिता सराफ संघाच्या वतीने 1990 साली लोकवर्गणीतून 51 किलो वजनाची चांदीची मूर्ती तयार करण्यात आली. याकरिता चांदी कारागीर वसंतराव माने यांनी दोन वर्षे परिश्रम घेतले. सुमारे 31 वर्षांनंतर सराफ संघाचे प्रयत्न व देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या समन्वयामुळे जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी मूर्ती देवस्थानकडे सुपूर्द करण्याची लेखी सूचना केली.
मूर्तीच्या मिरवणुकीत सहभागी होण्याचे आणि याकरिता कोणीही कसल्याची प्रकारची वर्गणी लोकांकडून घेऊ नये, असे आवाहन संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, सचिव अनिल पोतदार, संजय जैन, सुरेंद्र पुरवंत, अमोल ढणाल, राजू सावंत आदी उपस्थित होते.
लोकवर्गणीतून जमा झालेल्या चांदीतून मूर्ती साकारल्यानंतर 29 किलो चांदी अद्याप शिल्लक असून, बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित आहे. या चांदीपासून देवीच्या दैनंदिन धार्मिक विधीसाठी लागणार्या वस्तू देवस्थान समितीच्या सूचनेनुसार देण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.