कोल्हापूर : कारवाईचा बडगा उगारल्यास पेपरफुटीस आळा

कोल्हापूर : कारवाईचा बडगा उगारल्यास पेपरफुटीस आळा
Published on
Updated on

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ पदवी, पदव्युतर परीक्षेदरम्यान गेल्या काही वर्षांत अनेक पेपरफुटीचे प्रकार घडले. मात्र, परीक्षा प्रमाद समिती व शैक्षणिक संस्थांकडून जुजबी कारवाई झाली. मात्र, बी.कॉम. परीक्षा पेपरफुटीप्रकरणी श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेने चौघांवर बडतर्फीची धडक कारवाई केली. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. शैक्षणिक संस्थांनीच कारवाईचा बडगा उगारल्यास पेपरफुटीस आळा बसेल, अशी भावना शिक्षणक्षेत्रातून व्यक्त होत आहे.

दरवर्षी शिवाजी विद्यापीठ परीक्षा विभागाकडून महाविद्यालय व अधिविभाग स्तरावर पदवी, पदव्युत्तर पारंपरिकसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जातात. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून 2 लाख 50 हजार विद्यार्थी परीक्षेला बसतात. गेल्या काही वर्षांतील प्रश्नपत्रिकेतील चुका, पेपर बदलून जाण्याचे प्रकार 'एसआरपीडी' मोडमुळे कमी झाले आहेत. परंतु, गेल्यावर्षी सांगली जिल्ह्यातील कुंडलमधील एका महाविद्यालयात पेपरफुटीचा प्रकार घडला. याप्रकरणातील दोषी कंत्राटी पद्धतीने कामावर असल्याने त्यांना पदमुक्त करण्यात आले. महाविद्यालयासही आर्थिक दंडासह सक्त सूचना विद्यापीठाकडून देण्यात आल्या. शिवाजी विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल उन्हाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेंतर्गत आजअखेर 798 गैरप्रकरणे उघडकीस आली. परीक्षा प्रमाद समितीने कारवाई करून 648 प्रकरणांचा निपटारा केला आहे. 125 प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.

यावर्षीच्या 2023-24 च्या उन्हाळी सत्र परीक्षेंतर्गत 31 मे 2023 रोजी परीक्षा सुरू होण्याअगोदरच बी.कॉम. भाग-3 सत्र सहा अ‍ॅडव्हान्स अकाऊंटन्सी पेपर-4 (टॅक्सेशन) पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याची तत्काळ दखल घेत विद्यापीठाने दुसरा पेपर विद्यार्थ्यांना बदलून देत वेळही वाढवून दिली. त्यानंतर घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेत परीक्षा प्रमाद समितीच्या पाच सदस्यांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. परीक्षा विभागाने संबंधित कॉलेज प्रशासनाकडून अहवाल मागविला, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.
परीक्षा मूल्यमापन मंडळ संचालकांनी महाविद्यालयास भेट दिली. चारवेळा परीक्षा प्रमाद समितीकडून संबंधितांची चौकशी झाली. विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाद समितीकडून दोन महिने याप्रकरणी चौकशी, संबंधित कर्मचार्‍यांचे जबाब, कायदेशीर बाबी तपासण्याची प्रक्रिया झाली. त्यानंतर विद्यापीठ परीक्षा प्रमाद समितीने संबंधित चार कर्मचार्‍यांचे निलंबन करून त्यांच्यावर सेवाशर्तीनुसार शिस्तभंगाची कारवाईची शिफारस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शिक्षण संस्थेस केली.

श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेनेही शहाजी कॉलेजमधील पेपर फुटीप्रकरणी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली. या समितीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. संस्थेने नेमलेल्या समितीचा अहवाल जुलै महिन्याच्या अखेरीस प्राप्त झाला. संबंधितावर कडक कारवाई करावी, अशा सूचना समितीने केली. शिवाजी विद्यापीठाच्या काही सिनेट सदस्यांनीही संबंधितांवर कारवाई करावी, अशा सूचना केल्या. विद्यापीठ परीक्षा प्रमाद समितीचा अहवाल कॉलेजला प्राप्त झाल्यानंतर संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांनी व्यवस्थापन मंडळाशी चर्चा केली. त्यानंतर चार कर्मचार्‍यांच्या बडतर्फीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. संस्था व कॉलेज व्यवस्थापनने संयुक्तपणे चार कर्मचार्‍यांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली. याचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.

असा उघडकीस आला प्रकार

बी.कॉम. भाग-3 सत्र सहा अ‍ॅडव्हान्स अकौंटन्सी पेपर-4 (टॅक्सेशन) पेपर सुरू होण्यापूर्वी दीडच्या सुमारास फुटला. सातार्‍यात मोबाईलवर पेपर व्हायरल झाल्याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांना समजले. त्यांनी तत्काळ पेपर व कॉलेज कोड तपासून शहाजी कॉलेजला अडीच वाजता सुरू होणारा पेपर थांबविण्याचे आदेश दिले. 'एसआरपीडी' रूमचे सर्व फुटेज ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार त्याच दिवशी सर्व सीसीटीव्ही फुटेज विद्यापीठास देण्यात आले. यात संबंधिताने पेपरची प्रिंट काढून एका विद्यार्थ्यास पाठविली. त्याने ती व्हायरल केल्याचे तपासात समोर आले, असा पेपर फुटीचा प्रकार उघडकीस आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news