कागल : दिग्गजांना फटका..; घाटगे, मंडलिक, फराकटे यांना मतदारसंघ शोधावा लागणार

कागल : दिग्गजांना फटका..; घाटगे, मंडलिक, फराकटे यांना मतदारसंघ शोधावा लागणार

कागल : पुढारी वृत्तसेवा कागल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षणामुळे दिग्गजांना आरक्षणाचा फटका बसला असून युवराज पाटील यांना पुन्हा एकदा लॉटरी लागली आहे. अंबरिषसिंह घाटगे, विरेंद्र मंडलिक, मनोज फराकटे यांना मतदारसंघ शोधावे लागणार आहेत; मात्र तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राज्यातील राजकीय आघाड्याप्रमाणे होणार की, स्थानिक राजकीय गटानुसार होणार, याबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे.

कागल तालुक्यामध्ये माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेले माजी आमदार संजय घाटगे स्थानिक पातळीवर एकत्र आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले खासदार संजय मंडलिक आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यात स्थानिक पातळीवर युती होणार काय, यावरून निवडणुकीची रूपरेषा ठरणार आहे.

कापशी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने सर्वच राजकीय नेत्यांचा कस लागणार आहे. काही मतदारसंघांत नेत्यांना उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. सर्वसाधारण जागेसाठी खुला असलेल्या बानगे, कापशी आणि कसबा सांगाव मतदारसंघांमध्ये अनेक इच्छुकांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. काहीजण आपले मतदारसंघ सोडून या मतदारसंघात नशीब आजमविण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे ; मात्र राज्यातील राजकीय पक्ष आणि गटाप्रमाणे आघाड्या होणार की, स्थानिक राजकीय आघाड्याप्रमाणे युती होणार, यावरून निवडणुकीचे रणांगण रंगणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच कंबर कसली असून उमेदवारी कशी मिळेल, यासाठी प्लॅनिंग आखले जात आहे.

पंचायत समिती मतदारसंघामध्येदेखील अनेक मातब्बर उमेदवारांना आरक्षणाचा दणका बसला आहे. त्यामुळे अनेकांनी निवडणुकीचा नाद सोडून दिला आहे. कसबा सांगाव, म्हाकवे, सावर्डे, माद्याळ या ठिकाणी पंचायत समितीच्या मतदारसंघांमध्ये तुल्यबळ लढती होण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे.

जिल्हा परिषद मतदार संघामध्ये कसबा सांगाव मतदारसंघ हा पुन्हा एकदा सर्वसाधारण मतदारसंघ झाल्याने विद्यमान सदस्य युवराज पाटील यांना पुन्हा लॉटरी लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. सिद्धनेर्ली मतदारसंघ अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव राहिल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले अंबरिषसिंह घाटगे यांना मतदारसंघ शोधावा लागणार आहे. बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहिल्याने विद्यमान सदस्य मनोज फराकटे यांनादेखील मतदारसंघ शोधावा लागणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news