पुणे : खड्ड्यामागे पाच हजार अन् रस्त्यांची दुरुस्तीही; महापालिकेचा ठेकेदारांना दणका

पुणे : खड्ड्यामागे पाच हजार अन् रस्त्यांची दुरुस्तीही; महापालिकेचा ठेकेदारांना दणका

पुणे; पुढारी वृत्तसेवा: निकृष्ट रस्ते करणार्‍या ठेकेदारांवर महापालिकेने अखेर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या तीन वर्षांत करण्यात आलेल्या ज्या रस्त्यांचा 'डिफेक्ट लायबिलिटी पिरियड' शिल्लक आहे अशा रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसाठी ठेकेदारांकडून गुरुवारी एका दिवसभरात महापालिकेने प्रती खड्डा पाच हजार रुपयांप्रमाणे तब्बल 5 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांत झालेल्या संततधार पावसाने शहरातील रस्त्यांवर खडड्यांची चाळण झाली.

संपूर्ण शहरभर हेच चित्र आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या निकृष्ट रस्त्यांची गांभीर्याने दखल घेत कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, गेल्या 3 वर्षांत शहरात डांबरीकरण तसेच रिसर्फेसिंग केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडलेले असल्यास ठेकेदारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार धरत त्यांच्याकडून 1 चौरस मीटरपर्यंतच्या खड्ड्यांना प्रती खड्डा 5 हजारांचा दंड निश्चित करण्यात आला आहे. गुरुवारपासून पथ विभागाकडून ठेकेदारांवर दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

त्यात, धायरी काळूबाई मंदीर परिसर आणि कात्रज येथील नॅन्सी लेकटाऊन परिसर ते पद्मजा पार्क परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी 1 लाख 30 हजार, पर्वती पायथा परिसरातील खड्ड्यांसाठी 25 हजार, महंमदवाडी येथील महापालिका शाळेच्या परिसरातील खड्डेप्रकरणी 2 लाख 30 हजार हरेकृष्णपथ अणि सूस-म्हाळूंगे रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी अनुक्रमे 75 आणि 40 हजार असा पाच लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पथ विभागाकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news