

चंदगड : हाजगोळी (ता. चंदगड) येथील चाळोबा मंदिराशेजारी तिलारी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बेळगाव, गणेशपूर येथून तीन मित्रांसमवेत फिरायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. सदर घटना शनिवारी (दि. ३०) सायंकाळी घडली.
बेळगाव येथील हेल्पलाइन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री कॅमेऱ्याच्या मदत घेऊन ओमकार नामदेव पाटील (वय : २२, मुळगाव हाजगोळी व सध्या रा. गणेशपूर, गणेश मंदिराजवळ, बेळगाव ) या बुडून मृत्यू झालेल्या तरुणाला बाहेर काढले. या बाबतची वर्दी ओमकार याचे काका महेश म्हात्रु पाटील (रा. हाजगोळी) यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ओमकार हा बेळगाव, गणेशपूर येथून आपल्या तीन मित्रांसमवेत हाजगोळी येथे चाळोबा मंदिराच्याजवळ असलेल्या फार्म हाऊसवर तसेच काजू बागेत आला होता. यानंतर फिरण्यासाठी म्हणून ते मंदिराशेजारी असलेल्या तिलारी धरणाच्या बॅक वॉटर जवळ गेले. ओमकार हा पाण्यात उतरला मात्र केवळ पाच फुटावरच खोल दरी सारखा खड्डा आहे. जवळच असणाऱ्या पाण्यातील खोलीचा त्याला अंदाज आला नाही. आणि त्याला पोहताही येत नव्हते. त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ए. बी. उन्हाळे करत आहेत. ओमकार याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.