

Crime News: The body of the young man who had been missing for a month has been found.
संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा एमआयडीसी वाळूज परिसरातील तिसगाव शिवारात ए. एस. क्लबजवळ अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. हा मृतदेह बजाजनगर बाळासाहेब हंडीबाग (३४) यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, हा घातपात आहे की आत्महत्या? याचे गूढ अद्यापही कायम आहे.
रोहन हंडीबाग येथून महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेले रोहन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन हंडीबाग हे बजाजनगर वडगाव कोल्हाटी येथील कुंजबन सोसायटीत राहायचे. ते १० एप्रिलपासून बेपत्ता होते. याबाबत नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंदही केली होती.
दरम्यान, ३० एप्रिल रोजी तिसगाव फाटा ते ए. एस. क्लब दरम्यानच्या सर्व्हिस रोडलगत असलेल्या एका मोकळ्या प्लॉटवर झाडाझुडपात अत्यंत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. घटनास्थळी मृतदेहाचे अवशेष आणि अर्धवट पँटसह इतर कपडे विखुरलेले होते. पोलिसांनी तपास सुरू केला. यावेळी रोहन यांच्या वडिलांनी मृतदेहाच्या हातातील कडे आणि अंगावरील कपड्यांवरून तो आपलाच मुलगा असल्याची ओळख पटवली.
सीसीटीव्हीत दिसला, पण पुढे काय घडले?
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. या फुटेजमध्ये रोहन हे १० एप्रिल रोजी लातूरहून पहाटे ५ वाजेच्या सुमारास आयोसिस चौकात आल्याचे आणि तेथून पुढे पायी चालत गेल्याचे दिसत आहे. त्यानंतर ते बेपत्ता झाले आणि थेट ३० एप्रिलला त्यांचा मृतदेहच सापडला. त्यामुळे या मधल्या वेळेत नेमके काय घडले? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्यासह एमआयडीसी वाळूज पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.