

CPR Hospital Incident
कोल्हापूर : आजारी नातेवाईकाच्या शुश्रुषेसाठी आलेल्या महिलेला सीपीआरमध्ये उंदीर चावला. पद्मिनी सुनील लोखंडे (वय 50, रा. शेणे, ता. वाळवा, जि. सांगली) असे त्यांचे नाव आहे. सीपीआरमध्येच त्यांच्यावर उपचारांची वेळ आली. त्याबद्दल रुग्ण व नातेवाईकांतून सीपीआरच्या प्रशासनाविषयी तीव- संताप व्यक्त केला जात आहे. सोमवारी (दि. 2) पहाटे ही घटना घडली.
लोखंडे यांच्या नातेवाईकावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या शुश्रुषेसाठी लोखंडे थांबल्या होत्या. सीपीआरमधील दूधगंगा इमारतीत रुग्णाच्या बेडजवळच त्या झोपल्या होत्या. सोमवारी पहाटे पायाला काहीतरी चावल्याने त्यांना जाग आली. त्यांनी उठून पाहिले असता उंदराने चावल्याचे लक्षात आले. रक्तस्राव होऊ लागल्याने त्यांच्यावर अपघात विभागात उपचार करण्यात आले.
दरम्यान, सीपीआरमध्ये उंदरांचा उच्छाद झाल्याने प्रशासनाने त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांतून केली जात आहे.