कोल्हापूर : दोन्ही किडन्या निकामी झालेल्या लाकूडवाडी (ता. चंदगड) येथील ५० वर्षीय व्यक्तीवर मूत्रपिंड आणि म्यूकर मायकोसिस आजारावर एकत्र यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तब्बल एक महिन्यानंतर संबंधित रुग्णाला शुक्रवारी डिस्चार्ज करण्यात आल्याची माहिती औषध वैद्यकशास्त्र विभागाचे पथक क्रमांक ३ चे प्रमुख डॉ. बुद्धिराज पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
डॉ. पाटील म्हणाले, सीपीआर येथे ३१ ऑगस्ट रोजी जोतिबा कृष्णा राजगोळकर उपचारसाठी दाखल झाले होते. प्राथमिक तपासणीत रुग्णाला मूत्रविकाराचा त्रास असल्याचे निष्पन्न झाले. पुढील वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर रुग्णाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले. तज्ज्ञांद्वारे औषधोपचार, डायलेसिस सुरू केले. सात वेळा त्यांना डायलेसिस उपचारपध्दतीचा अवलंब केला. उपचार सुरू असताना रुग्णाला म्युकर मायकोसिस झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पुढील उपचारासाठी रुग्णाला कान, नका, घसा विभागातील तज्ज्ञांद्वारे उपचार केले. नाक, कान, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अजित लोकरे म्हणाले, रुग्णावर म्यूकर मायकोसिसची शस्त्रक्रिया सध्या यशस्वी झाली आहे; परंतु पुन्हा संबंधित रुग्णाचा एमआरआय करून आजारावावत पहावे लागले. रुग्ण या आजारातून पूर्णतः बरा झाला असे म्हणता येणार नाही असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत नाक, कान, घसा शास्त्र विभागात २५० म्युकर मायकोसिसच्या शस्त्रक्रिया झाल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार बैठकीला अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, औषध वैद्यकशास्त्रख डॉ. अनिता परितेकर, सर्जरी विभाग प्रमुख डॉ. वसंतराव देशमुख आदी उपस्थित होते.