

Electrical Worker Death
विशाळगड : अवघ्या सात महिन्यांच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून पितृछत्र हिरावून घेणारी एक हृदयद्रावक घटना शाहूवाडी तालुक्यात घडली आहे. वारूळ येथील कंत्राटी वायरमन, गणेश किसन पाटील (वय २८), यांचा विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेने केवळ पाटील कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण वारूळ गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या लाडक्या गणेशला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संपूर्ण गावाने व्यवहार बंद ठेवले.
मंगळवारी (दि. 22) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गणेश पाटील वालूर येथील सामाजिक वनीकरणाच्या नर्सरीमधील कृषी वीज वाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी ११ हजार केव्हीच्या पोलवर चढले होते. काम करत असतानाच त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला आणि ते जागीच ठार झाले. गणेश गेली दीड वर्षे महावितरणमध्ये कंत्राटी वायरमन म्हणून काम करत होते. त्याच्याकडे निनाई परळे बीटमधील गावांचा कार्यभार होता. मात्र मंगळवारी सकाळी गणेशला त्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील वालूर येथे शेती पंपाचा खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठवण्यात आले होते. ११ हजार केव्हीच्या पोलवर विद्युत दुरुस्तीचे काम सुरू असतानाच त्याला विजेचा जोराचा शॉक बसला, यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शाहुवाडी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पी.व्ही. कुंभारे आणि अभियंता पृथ्वीराज घोरके यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गणेश यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, सात महिन्यांचा मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद शाहुवाडी पोलिसांत झाली आहे.
गणेशचे कार्यक्षेत्र नसतानाही त्याला त्या ठिकाणी का पाठवले? अशी विचारणा नातेवाईकांसह नागरिकांनी केली. त्यामुळे गणेशच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईक आणि नागरिकांनी केली आहे.
‘गणेश पाटील हे कंत्राटी वायरमन म्हणून कामावर गेल्या दीड वर्षापासून कार्यरत होते. त्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना महावितरण कडून तात्काळ चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.’
पी.व्ही. कुंभारे, उपकार्यकारी अभियंता, शाहुवाडी
गणेशच्या पश्चात त्याची आई, वडील, पत्नी, अवघ्या सात महिन्यांचा मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे. कमावता मुलगा आणि घरातील आधारस्तंभ गमावल्याने पाटील कुटुंबावर आभाळच कोसळले आहे. आपल्या लहानग्या बाळाला वडिलांचे छत्र कायमचे नाहीसे झाल्याचे पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. एकीकडे मदतीची घोषणा झाली असली तरी, एका पैशानेही गणेशची उणीव भरून निघणार नाही, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. या घटनेमुळे कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.