

Vishalgad Amba Road Blockage
विशाळगड : विशाळगड - आंबा मार्गावरील विशाळगड घाटात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे रस्त्यात एक मोठे झाड कोसळले. सुदैवाने झाड पडताना रस्त्यावर कोणतीही वाहने किंवा व्यक्ती नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, झाड रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी विशाळगडाला भेट देणाऱ्या पर्यटकांची तसेच परिसरातील स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाळगड घाटातील रस्त्याच्या दुतर्फा घनदाट वनराई असल्याने झाडे कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. वादळी वारा आणि पावसामुळे हे मोठे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर वन्यप्राण्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास धोकादायक बनू शकतो.
स्थानिक नागरिक आणि पर्यटक यांनी संबंधित विभागाकडे तत्काळ हे झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.