

बांबवडे : सुरेश जगन्नाथ खोत (वय ४९, रा. भैरेवाडी, ता.शाहूवाडी) या तथाकथित पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. शाहूवाडी तहसीलदार कार्यालयात प्रलंबित महसूल जमिनीचा कागदोपत्री फेरफार करून देतो, असे सांगून सदर कामाच्या बदल्यात ठरलेली ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली. एसीबी कोल्हापूरच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तहसील कार्यालयाच्या आवारात बुधवारी (ता.१९) सकाळी सापळा रचून ही धडक कारवाई केली. या खळबळजनक कारवाईने शाहूवाडी तहसीलदार कार्यालय पुन्हा एकदा ठळक चर्चेत आले आहे.
दरम्यान, सदरची लाच रक्कम ही शाहूवाडी तहसीलदारांना द्यावी लागणार आहे, असे सांगून पंटर खोत याने तक्रारदाराकडून ५ लाख रुपये स्वीकारल्याचे समोर आल्यामुळे तहसीलदार रामलिंग चव्हाण हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मात्र, आपण कोणाकडेही कसलीही लाच मागितलेली नाही. या लाच प्रकरणाशी आपला दुरान्वये देखील संबंध नसल्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी तातडीने बोलविलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांसमोर सांगितले.
एसीबीच्या अधिकाऱ्यांना देखील आपण निर्दोष असल्याचे तहसीलदारांनी सांगितल्याचे समजते.
दरम्यान, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार व्यक्तीचे मामे भाऊ आणि त्यांचे सहहिस्सेदार यांनी सावे (ता. शाहूवाडी) जमीन खरेदी केली आहे. या जमिनीचे गट नंबरच्या फेरफार कागदपत्रात खाडाखोड करून काही चुकीचे गट नंबर नोंदवून शासनाची दिशाभूल आणि फसवणूक करणाऱ्या घटकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. तसेच सदर जमिनीचा पूर्ववत सदोष सातबारा पत्रक, फेरफार आदी कागदपत्रे मिळावीत, अशी तक्रार संबंधित मामे भाऊ आणि त्यांचे सहहिस्सेदार यांनी तहसीलदार कार्यालयाकडे केली होती. या प्रकरणी तहसीलदार चव्हाण यांच्यासमोर सुनावणी देखील चालू आहे. तक्रारदार हे या कामाचा पाठपुरावा करीत होते.
दरम्यान, तक्रारदार हे सदर प्रकरणाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी तहसीलदार कार्यालयात आल्यावर संशयित पंटर सुरेश खोत याने त्यांना गाठले. 'तुमचे प्रलंबित महसुल जमीन फेरफार काम लगेच पूर्ण करून देतो. त्याकरिता तहसीलदारांना देण्यासाठी ५ लाख रुपये लाच द्यावी लागेल' अशी मागणी केली. याबाबत तक्रारदाराने एसीबी (कोल्हापूर)कडे तक्रार नोंदवली.
याला अनुसरून पडताळणी पश्चात एसीबीच्या पथकाने तक्रादाराला विश्वासात घेऊन तहसीलदार कार्यालयाच्या परीसरात बुधवारी (ता.१९) सकाळी सापळा रचून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि पंच यांच्या समक्ष संशयित सुरेश खोत याला तक्रातदार यांच्याकडून ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. शाहूवाडी पोलीस ठाण्यात पंटर सुरेश खोत यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एसीबीच्या पथकाने गुन्ह्याच्या अनुषंगाने तहसीलदार कार्यालयातील कागदपत्रे सील करून ताब्यात घेतली आहेत.
एसीबी (पुणे) चे पोलीस उपायुक्त तथा अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.शीतल जान्हवे-खराडे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी, यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी कोल्हापूरच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील, सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे, हेड कॉन्स्टेबल विकास माने, संदीप काशीद, उदय पाटील, प्रशांत दावणे, पो. ना. सुधीर पाटील आदींच्या पथकाने ही सापळा कारवाई यशस्वी केली.