Vishalgad Fort Kolhapur : वृक्षांअभावी विशाळगड बनला ‘उजाड’

Vishalgad Fort Kolhapur : वृक्षांअभावी विशाळगड बनला ‘उजाड’

विशाळगड; सुभाष पाटील : विशाळगड किल्ला ऐतिहासिक व धार्मिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या रांगेतील हा किल्ला वृक्षांअभावी उजाड, बोडका व रुक्ष बनला आहे. गड वगळता सभोवतालचा परिसर घनदाट वृक्षराजीने बहरला आहे. गडावर मात्र विश्रांतीसाठी एखादाही वृक्ष नसणे ही दुर्दैवाची बाब आहे.

गडावरील रणमंडळ टेकडी, बाजीप्रभू व फुलाजींची समाधी स्थळे, मारुती मंदिर, भगवंतेश्वर मंदिर, अहिल्याबाईंची समाधी, चाँद इमारत आदी ठिकाणी वृक्ष लागवड झाल्यास ही ठिकाणे सुशोभित होतील. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना विसावा घेण्यासाठी झाडांचा आधार मिळेल. पक्षांनाही निवारा मिळेल व उजाड व रुक्ष वाटणारा गड वृक्षराजीने बहरेल.

वनविभागाच्या वतीने गडाच्या पायथ्यालगतच्या जागेत वनीकरण केले जाते. मात्र गडावर वृक्ष लागवड करण्याचे आजपर्यंत कसे सुचले नाही याचे सर्वसामान्यांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 'सुंदर विशाळगड' या आराखड्यात वृक्षलागवड, बाग-बगीचा प्रस्तावित आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. गडाच्या सुशोभीकरणासाठी येथे वनीकरण होणे आवश्यक आहे. गडावरील ऐतिहासिक ठिकाणी त्यांना जोडणारे मार्ग येथे वृक्ष लागवड व्हावी व ग्रामपंचायतीने वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घ्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

पर्यटनस्थळ म्हणून गडाला भेट दिली. उन्हाच्या तडाख्यापासून बचाव व्हावा, असे गडावर एकही झाड नाही. उन्हाचा त्रास होऊ लागल्याने संपुर्ण गड न पाहताच माघारी फिरावे लागले. गडावर झाडे लावणे गरजेचे आहे.

– युवराज कदम, पर्यटक

गडावर झाडे नसल्याने उन्हाळ्यात पर्यटकांचे हाल होतात. वनविभागाने वृक्ष लागवड करावी, अशी सातत्याने मागणी गडवासीयांतून होत आहे. मात्र याकडे वनविभागाचे दुर्लक्ष आहे.

– बंडू भोसले, सामाजिक कार्यकर्ते, विशाळगड

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news