नद्यांची पातळी खालावली कोल्हापुरात पाणीबाणी | पुढारी

नद्यांची पातळी खालावली कोल्हापुरात पाणीबाणी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पंचगंगा व भोगावती नद्यांतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. परिणामी, बालिंगा उपसा केंद्र ठप्प झाले आहे. शिंगणापूर उपसा केंद्रातील दोन पंपही पूर्ण बंद पडले आहेत. कोल्हापूर शहरातील बहुतांश भागांत बुधवारी पाणीबाणी निर्माण झाली. टँकरद्वारेही पाणी मिळाले नसल्याने नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे महिलावर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान, राधानगरी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. गुरुवारी पहाटेपर्यंत पाणी कोल्हापूरपर्यंत पोहोचेल. त्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे महापालिका अधिकार्‍यांनी सांगितले.

पंचगंगेची पातळी 534.20 मीटर

शिंगणापूर केंद्रातून पंचगंगा नदीतील पाण्याचा उपसा केला जातो. त्यासाठी शिंगणापूर केंद्रात 435 एच.पी.चे पाच पंप आहेत. त्यापैकी चार पंप चोवीस तास सुरू असतात. नदीतील पाणी पातळी शिंगणापूर बंधार्‍यावर कमीत कमी 534.50 मीटर इतकी असावी लागते. मात्र, बुधवारी पाणी पातळी 534.20 इतकी होती. त्यामुळे दोन पंप बंद झाले. परिणामी, दोन पंपांद्वारे उपसा सुरू राहिला.

‘भोगावती’ची पातळी 1752 फूट

बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रातून भोगावती नदीतील पाण्याचा उपसा होतो. त्यासाठी किमान 1752 फूट पाणी पातळी असावी लागते. मात्र, बुधवारी नदीतील पाणी पातळी 1742 फूट होती. त्यामुळे बालिंगा उपसा केंद्रातील 300 एच.पी. व 200 एच.पी.चे दोन्ही पंप बंद पडले. फक्त नागदेववाडीतील 200 एच.पी.चा एकच पंप सुरू राहिला. त्यामुळे बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रावर अवलंबून असलेल्या कोल्हापूर शहरातील ए, बी, सी, डी वॉर्डांतील पाणीपुरवठा ठप्प झाला.

Back to top button