Madhuri Elephant News
कोल्हापूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाच्या ‘माधुरी ऊर्फ महादेवी’ हत्तीणीला गुजरात येथील वनतारा हत्ती कॅम्पमध्ये नेण्यात आले. वनतारा हा वन्यजीव संरक्षण प्रकल्प आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांचा हा महत्त्वाकांक्षी वन्यजीव संरक्षण प्रकल्प आहे. हे जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय आणि पुनर्वसन केंद्र म्हणून ओळखले जाते.
‘महादेवी’ला वनताराच्या अधिकार्यांकडे सुपूर्द करताना नांदणीतील लोकांनी भावनिक निरोप दिला होता. तिची पाठवणी करताना नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. दरम्यान, वनताराचे सीईओ विवान करणी शुक्रवारी कोल्हापुरात दाखल झाले. ते महास्वामींची भेट घेणार आहेत. त्यांनी नांदणीला जाऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विनंती केली जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आपण नांदणीत जाऊ नये, अशी विनंती त्यांना पोलिसांकडून करण्यात आली.
यामुळे वनताराचे सीईओ काहीवेळ विमानतळावर थांबले. त्यांनी तिथे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याशी चर्चा केली. त्यांनी नांदणीत न जाता मठाधिपती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींना कोल्हापुरात बोलावण्यात आले आहे. येथे खासदार धैर्यशील माने, धनंजय महाडिक उपस्थित आहेत. येथे दुपारपर्यंत चर्चा सुरु होती.
जैन समाजाच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर दौऱ्यात खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन माधुरी हत्तीणीबाबत असलेली लोकभावना सांगितली होती. यावर शिंदे यांनी पुढाकार घेऊन अनंत अंबानी यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. यानंतर वनताराचे सीईओ कोल्हापुरात आले आहेत. मठाधिपती यांच्याशी चर्चा करून तडजोडीचा मार्ग काढण्यात येणार असल्याचे समजते.
दरम्यान, कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात माधुरी हत्तीणीला पुन्हा परत आणण्याबाबत मोहीम चालवण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांनीसुद्धा याबाबत आवाज उठवत नांदणी गावाला दिली आहे. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाला १,२०० वर्षांची परंपरा आहे. या मठाकडे ४०० वर्षांपासून हत्ती आहे. एका बाजूला प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना, प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदवले होते. त्यानुसार नांदणी येथील ‘माधुरी ऊर्फ महादेवी’ हत्तीणीला गुजरात येथे पाठविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, याविरोधात नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण मठाची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली.