

सांगली ः शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील माधुरी हत्तीला परत आणा, तसेच सांगली संस्थानच्या गणपती मंदिरात नवीन बबलू हत्ती आणा, या दोन्ही हत्तीचे संगोपन आम्ही करू, अशी मागणी करीत भाजप आणि शहरातील नागरिकांतर्फे गुरुवारी येथील मारुती चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन भाजपाचे नेते पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. मागणीला पाठिंबा देण्यासाठी यावेळी फलकावर सह्यांची मोहीम राबविण्यात आली. सांगलीकरांच्या भावना लक्षात घेऊन नवीन हत्ती आणण्याची गरज आहे. नवीन हत्तीला आम्ही जपू, असे काही आंदोलकांनी यावेळी सांगितले.
पृथ्वीराज पवार म्हणाले, माधुरी हत्ती कायदेशीररित्या परत मिळावा, सांगलीत नवीन बबलू हत्ती आणावा, या मागणीसाठी सह्यांची मोहीम राबविली. या मोहिमेत तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यत अनेकांनी सहभाग घेतला. ही मोहीम आणखी तीव्र करणार आहे. घेतलेल्या सह्या राज्य, केंद्र शासन आणि वन विभाग यांच्याकडे पाठवणार आहे. याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. यावेळी माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, चंदू सूर्यवंशी, प्रशांत चिपळूणकर, विजय साळुंखे, माधुरी वसगडेकर, विलास शिंदे, सतीश जाधव, स्नेहलता जगताप यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.