

पुणे : एकाच घरात राहत असताना वैष्णवी आणि मला कधी बोलू दिले जात नव्हते. वैष्णवी सर्वांना घाबरत होती. त्यामुळे ती कधीच काही सांगत नव्हती. तिला मारहाण झाल्याची घटना मला घरातील कामगारांकडून समजत होती. तिने मला सांगितले असते तर आम्ही दोघींनी मिळून कुटुंबियांना धडा शिकविला असता, अशी भावना वैष्णवी हगवणे यांच्या जाऊ मयुरी जगताप-हगवणे यांनी गुरूवारी (दि.२२) व्यक्त केली. माझ्या सासरची मंडळी क्रूर असून गुन्ह्यातील दोषींना जन्मठेपेची शिक्षा द्यावी, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
गंगाधाम येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या छळाची कहाणी सांगितली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, पती घरी नसताना मला पण दीर, सासू, सासरा आणि नणंद या चौघांकडून बेदमपणे मारहाण केली जात होती. आज मी माझ्या पतीमुळे जिवंत आहे. कुटुंबियांकडून होत असलेला जाच आणि त्यांच्याकडून जिवाला धोका असल्याने माझ्या पतीने मला माहेरी आणून सोडले. मी माझ्या आईकडे सुखरूप राहील, अशी त्यांची भावना होती. सासरी एकाच घरात असताना आम्ही दोघीही एका रुममध्ये दीड वर्ष वेगळे राहत होतो. काही दिवसांत आम्ही नवीन घर घेऊन तेथे राहणार होतो. वैष्णवी आणि मी सख्ख्या जावा असूनही नणंद करिश्मा आणि वैष्णवीचा नवरा म्हणजे माझा दीर शशांकने आम्हाला कधी एकमेकींशी बोलू दिलं नाही,असेही त्या यावेळी म्हणाल्या.
नणंदेला माझा पती करीत असलेला लाड पाहवत नव्हते. साडीपासून सर्व गोष्टींमध्ये तिचा वरचढ होता. तिच्या म्हणण्यानुसार सर्व होत होते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा आमच्याशी वाद घातला जात होता. इतकेच नव्हे तर चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झाला, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. पुढे त्या म्हणाल्या, सासर्यांकडे बघते, म्हणून त्रास दिला जात होता. आम्हाला वैष्णवीशी बोलू दिले जात नव्हतं, आमच्यावरही संशय घेतला जात होता. त्यामुळे त्रास दिसत असूनही आम्ही बोलू शकलो नसल्याचे मयुरी जगताप यांनी सांगितले. दरम्यान फॉर्च्यूनर कारवरुनही त्यांनी खुलासा केला. ब्रँड असल्यावर तिथं दिसायला चांगलं दिसतं, असं म्हणत त्यांच्याकडून (कस्पटे कुटुंबाकडून) सासूने मागणी केली. हे मी घरातील हॉलमधील फोनवरून बोलताना ऐकले, असेही त्या म्हणाल्या.
मला मारहाण झाल्यानंतर पौड पोलिस ठाण्यात गेले. मात्र, माझी तक्रार घेण्यात आली नाही. त्यानंतर माझी एफआयआर दाखल करण्यात आली. माझ्या बाबतीत जे झाले त्यादरम्यान कुटुंबीय आठ दिवस फरार होते. नंतर नणंदेने आमच्या विरोधात तक्रार दिली. राजकीय संबंधित असल्याने पोलिसांवर दबाव आणण्यात येत होता. त्यामुळे काही होत नव्हते. पोलिसांनी माझ्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती तर ही घटना घडली नसती. लहान बाळाच्या बाबत माझ्या चुलत सासर्यांचा फोन आलेला की, बाळाचे खूप हाल होत आहेत. मी त्यांना म्हटलं की, बाळ माझ्या ताब्यात द्या, मी त्याचा सांभाळ करते. पण निलेश चव्हाणकडे बाळ असल्याने मला मिळालं नाही, असं मयुरी जगताप-हगवणे म्हणाल्या.