

टोप (पुढारी वृत्तसेवा) :
हातकणंगले तालुक्यातील टोप येथे आज मंगळवारी पहाटे पुण्याच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक अचानक टायर फुटल्याने महामार्गावरच पलटी झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
MH 09 FL 9924 क्रमांकाचा हा ट्रक हॉटेल मंथनसमोर महामार्गावर पलटी झाला. ट्रक पलटी होताच काही क्षणांतच वाहतूक कोंडी निर्माण झाली. पहाटेपासूनच महामार्गावरून जाणाऱ्या जड व हलक्या वाहनांची संख्या मोठी असल्याने कोंडी अधिक तीव्र झाली आहे. विशेष म्हणजे, टोप ग्रामपंचायत कार्यालयासमोर तसेच कासारवाडी फाट्यावर महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी आणि छोटे-मोठे अपघात होणे ही नित्याची बाब बनली आहे. आजच्या ट्रक अपघातामुळे या समस्येत आणखी भर पडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी शिरोली पोलीस आणि महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पलटी झालेला ट्रक बाजूला करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ट्रक पूर्णपणे हटविण्यास वेळ लागत असल्याने वाहनधारकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
महामार्गावरील रखडलेले काम, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि वारंवार होणारे अपघात यामुळे वाहनधारक व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “महामार्गाचे काम अजून किती अपघात आणि वाहतूक कोंडी घडविणार?” असा सवाल संतप्त वाहनधारक आणि नागरिकांकडून विचारला जात आहे.