

पणजी : पुढारी वृत्तसेवा
भारताच्या आणि गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले व अनेक हाल अपेष्टा सोसलेल्या अनेक वीरांची माहिती तत्कालीन सरकारने नजरेआड केली. मात्र, आता सत्य घटना लोकांपर्यंत पोहचत आहे. प्रेम प्रकाश यांनी संशोधन करून लिहिलेल्या 'द स्टोरी देंट इंडिया हॅज फोरगॉटन' या ऐतिहासिक पुस्तकाच्या माध्यमातून खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचत आहे, त्याचा लाभ युवापुढीने घ्यावा व देशासाठी त्याग करण्यास तयार राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
दोनापावला येथे पुस्तकाचे अनावरण केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, इतिहासातील अनेक गोष्टी एकतर विसरल्या गेल्या आहेत किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्या गेल्या आहेत. त्या या पुस्तकात नोंदवल्या आहेत. शेकडो अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची नोंद यात आहे. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा पाया रचण्याचे धैर्य दाखवले. त्या विनायक दामोदर सावरकर, सुभाष चंद्र बोस यांचा त्याग आणि बलिदानाच्या कथा यात आहेत.
हा संघर्ष काही स्वार्थी घटकांकडून चुकीच्या पद्धतीने मांडला गेला आहे. गोवा मुक्ती संग्रामावरील प्रकरण आपल्यासाठी विशेष महत्त्व ठेवते. गोवा मुक्ती संग्राम उर्वरित भारताच्या स्वातंत्र्यानंतर खूप उशिरा झाला; ज्यात विलक्षण धैर्य, त्याग आणि लोकांचा सहभाग होता. हजारो लोकांनी प्रतिकार केला, वसाहतवादी राजवटीचा सामना केला, तुरुंगवास आणि छळ सहन केला आणि आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे गोवा मुक्त झाला.
मी गोवा व भारतातील तरुणांना आवाहन करतो की, त्यांनी आपला इतिहास विशेषतः गोवा सारख्या प्रादेशिक स्वातंत्र्य लढ्यांचा सखोल अभ्यास करावा आणि त्यांना राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर आणावे. तरुण लेखक, विद्वान, चित्रपट निमति आणि डिजिटल निर्मात्यांना केवळ पुस्तकांद्वारेच नव्हे, तर इतिहासाचे दस्तऐवजीकरण करण्यास आवाहन करत असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. अनेक वर्ष देशावर सत्ता उपभोगताना राजकीय नेतृत्वाने खरी सत्ये लोकांसमोर येऊच नयेत यासाठी प्रयत्न केले, असे मुख्यमंत्री म्हणाले.
खरा अभ्यास तपासून लेखन :
प्रकाश लेखक प्रेम प्रकाश यांनी देशाला स्वातंत्र्य मिळविण्यास फक्त गांधी हे एकमेव कारणीभूत नाहीत, तर सुभाषचंद्र बोस सारख्या स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांनी परदेशांतून इंग्रजांवर जे दडपण तयार केले, वीर सावरकर यांनी इंग्रजांच्या विरोधात जो संग्राम पुकारला, अशा अनेक ज्ञात-अज्ञात योद्ध्यांच्या प्रयत्नांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, गेल्या सत्तर वर्षांमध्ये त्याबाबतची माहिती जास्त लोकांपर्यंत पोहोचली गेली नाही. आपण इंग्लंडमध्ये जाऊन खरा अभ्यास तपासून हे पुस्तक लिहिल्याचे ते म्हणाले