गुलाल-खोबर्‍याची उधळण करत जोतिबाचा सरता रविवार सोहळा

गुलाल-खोबर्‍याची उधळण करत जोतिबाचा सरता रविवार सोहळा

जोतिबा डोंगर, पुढारी वृत्तसेवा : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या यंदाच्या उत्सवातील अखेरचा पालखी सोहळा रविवारी उत्साहात संपन्न झाला. सरता रविवार म्हणून म्हणून परिचित असणार्‍या या सोहळ्यावेळी भाविकांनी गुलाल- खोबर्‍याची उधळण केली.

जोतिबा उत्सवांतर्गत सरता रविवार प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाचा अखेरचा पालखी सोहळा असल्याने भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. रविवारी पहाटे चार वाजता घंटानाद झाल्यानंतर मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर पाद्यपूजा व काकड आरती झाली. सकाळी आठ वाजता श्री जोतिबा देवासह इतर देव-देवतांना अभिषेक घालण्यात आला.

रविवारी एकादशीनिमित्त सकाळी जोतिबाची विठ्ठल रूपातील महापूजा बांधण्यात आली होती. साडेअकरा वाजता  श्रींचा धुपारती सोहळा संपन्न झाला. त्यानंतर दिवसभरात असंख्य भाविकांनी कुलदैवत जोतिबा देवाचे दर्शन घेतले. यावेळी 'चांगभलं'चा अखंड गजर करण्यात आला. सायंकाळी श्रींचा अखेरचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थांनी साखर-पेढे वाटले. गुलाल आणि खोबर्‍याची उधळण केली. यानंतर विजयादशमी दसर्‍याला श्रींच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ होईल. चार महिने पालखी सोहळा बंद असल्याने जोतिबाचा अश्व, उंट पायथ्याला पोहाळे गावी पाठवण्यात येणार आहेत.

यात्रा काळापासून जोतिबाच्या दर्शनासाठी भाविकांची गेले दोन महिने प्रचंड गर्दी होती. या काळात पोलिस व प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य मिळाले. यापुढेदेखील सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
धैर्यशील तिवले, जोतिबा देवस्थान समिती इनचार्ज

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news