

इचलकरंजी; विठ्ठल बिरंजे: स्वातंत्र्यापासून हक्काच्या घरांचे स्वप्न पाहत असलेले इचलकरंजीतील फासेपारधी समाज लवकरच झोपडपट्टीमुक्त होवून पक्क्या घरात राहायला जाणार आहेत. पालिकेकडून ८४ घरकुलांचा प्रस्ताव घोडेगाव येथील आदिवासी विकास प्रकल्पाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. यासाठी ४ कोटी रुपयांची तरतुद करावी, असे प्रस्तावित केल्याने फासेफारधी समाजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
इचलकरंजी शहरात पारधी समाज विखुरलेला आहे. जागा मिळेल त्या ठिकाणी तात्पुरत्या पाल्याच्या झोपड्या उभारुन निवर्याची सोय केली आहे. स्वामी मळा, लिगाडे मळा, कोले मळा आदी परिसरात फासेपारधी समाज स्थायिक झाला आहे. आजही या वसाहतींना समाजिक सुविधा पुरेशा प्रमाणात नाहीत. संख्येने कमी असल्याने लोकप्रतिनिधींनीही या समाजाकडे दुर्लक्ष केले.
तर रोजीरोटीसाठी घरातील कर्ती माणसं सतत गावाबाहेर असल्याने या समाजाकडे प्रशासनाचेही लक्ष वेधले नाही. मात्र. येथील काही तरुणांनी मोहन काळे यांच्या नेतृवाखाली आदिवासी फासेपारधी बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करुन समाजाच्या विविधा प्रश्नांबाबत लढा उभारला. अनेकवेळा पालिकेवर धडक मारली आणि लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वसाहतीचे सर्व्हेक्षण करण्यात आले. मात्र, पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत.
मध्यंतरी समाजाने आम्हाला सुरक्षा द्या नाहीतर फास लावून घेण्याची परवानगी मिळावी, अशी लेखी मागणी प्रांताधिकार्यांकडे केली होती. त्यामुळे हडबडून जागे झालेल्या प्रशासनाने त्यांना पहिल्यांदा फासेपारधी असल्याचे दाखले देवून अधिकृतपणे फासेपारधी म्हणून घोषीत केले. त्यानंतर सर्व्हे करुन बेघर कुटुंबे निश्चित केली आणि घरांचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. पहिल्या टप्प्यात ८४ घरकुलांचा प्रस्ताव आहे.
घोडेगाव येथील एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्पाकडून नाशिक येथील आदिवासी आयुक्त यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. लवकरच हा प्रस्ताव निधीच्या तरतुदीसह अंतिम मान्यतेसाठी आदीवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्याकडे जाणार आहे. यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी पाठपुरावा सुरु केला आहे.
हेही वाचलंत का?
अनेक वर्षांपासूनच्या लढ्याला न्याय
संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे यश टप्प्यात आले आहे. ३१ मार्चपूर्वी बजेट मंजूर होवून प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
– मोहन काळे