

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याचा आजचा शेवट दिवस आहे. अर्ज सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. पण अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने पेमेंट सक्सेसफुल झाले असतानाही वेबसाईटवर पेमेंट प्रलंबित अशी नोट येत आहे. खात्यातून पैसे कट झाले आहेत, ऑनलाइन अर्ज सबमिट होत आहेत. तरीही अर्ज नेमका सबमिट झाला आहे का नाही, अशा संभ्रमात अनेक विद्यार्थी आहेत.
तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत एक दिवसाने वाढविण्याचा निर्णय महसूल व वनविभागाने काल घेतला. तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याची सोमवारी संपलेली मुदत मंगळवारी रात्री उशिरापर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे तलाठी भरतीसाठी अर्ज दाखल करू न शकलेल्यांना दिलासा मिळाला आहे. अनेकांनी चार दिवसापूर्वी अर्ज भरला होता. त्यांचे पेमेंट सक्सेसफुल झाले आहे. परंतु वेबसाईटवर पेमेंट प्रलंबित असे दाखवत आहे. यावर शासनाने त्वरित तोडगा काढावा व विद्यार्थ्यांना योग्य माहिती द्यावी, अशी मागणी अर्जदारांकडून होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वनविभागाने राज्यात तलाठ्यांच्या 4644 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 26 जून पासून 17 जुलै पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. राज्यभरातून लाखो तरुण- तरुणींनी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात केल्याने सर्व्हर डाऊन होण्याचा प्रकार सतत घडत राहिला होता. शिवाय अर्जासोबत जोडण्यासाठी विविध प्रकारचे दाखले आवश्यक होते. काही अर्जदाराने ऑनलाइन पेमेंट दोन ते तीन वेळा केले आहे. त्यांना हे पेमेंट परत मिळणार का, असा प्रश्न अर्जदारांना पडला आहे.
हेही वाचा :